अमरावती रेल्वे स्थानकावर ३ तिकीट निरीक्षकांविरुद्ध कारवाई; अतिरिक्त रक्कम आढळल्याचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 02:01 PM2022-12-01T14:01:49+5:302022-12-01T14:03:25+5:30
मध्य रेल्वे मुंबई दक्षता पथकाचे धाडसत्र, मुंबई-अमरावती एक्स्प्रेसमध्ये होते टीसी कार्यरत
अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या दक्षता पथकाने दोन तिकीट निरीक्षकांकडे अतिरिक्त रक्कम तर, एकावर कायदेशीर कारवाई मंगळवारी अमरावतीरेल्वे स्थानकावर करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
आर.डी. नांदूरकर(अमरावती), रत्नेश तिवारी (बडनेरा) तर ए. आर. खान (मूर्तिजापूर) या तिन्ही तिकीट निरीक्षकांवर मुंबई दक्षता पथकाने रेल्वे नियमानुसार कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबई रेल्वे दक्षता पथकाचे प्रमुख तीन अधिकारी यासह सहा जण असे एकूण नऊ जण मुंबई येथून २८ नोव्हेंबर रोजी मुंबई- एक्स्प्रेसमध्ये प्रवास करीत होते. धावत्या गाडीत या दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असलेल्या तिकीट निरीक्षकांच्या हालचाली टिपल्या.
प्रवाशांसाेबत आर्थिक व्यवहार, आरक्षण बर्थ देताना पैशाची डिमांड असे अनेक निरीक्षण या दक्षता पथकाने नोंदविले. अमरावतीत गाडी येताच दक्षता पथकाने मुख्य तिकीट तपासणी निरीक्षकांचे कार्यालय गाठले. दरम्यान तिकीट निरीक्षक आर.डी. नांदूरकर आणि रत्नेश तिवारी हे कार्यालयात येताच दक्षता पथकाने या दोघांचीही झाडाझडती घेतली. तेव्हा नांदूरकर यांच्याकडे ५ हजार रूपये तर, तिवारींकडे अडीच हजार रूपये आढळले.
तिकीट निरीक्षक कर्तव्यावर असताना त्यांच्याकडील रकमेची नोंद कार्यालयात ठेवावी लागते. मात्र, या दोन्ही तिकीट निरीक्षकांकडे दक्षता पथकाने धाडसत्र राबविले असता अतिरिक्त रक्कम आढळल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच तिकीट निरीक्षक ए. आर. खान हे अमरावती मुख्यालय येण्यापूर्वीच मूर्तिजापूर येथे उतरल्यामुळे त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार शिक्षेची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. नांदूरकर आणि तिवारी यांनी कर्तव्यावरून परतल्यानंतर अमरावती रेल्वे स्थानकावरील बुकिंग ऑफिसमध्ये रक्कम जमा केल्यानंतर दक्षता पथकाने धाडसत्र राबविल्याची माहिती आहे.
दक्षता पथक प्रवासी बनून आले
मुंबई येथील रेल्वेचे दक्षता पथक हे अमरावती एक्स्प्रेसमध्ये प्रवासी बनून आले होते. त्यांच्यासोबत सुरक्षा यंत्रणा ही देखील सिव्हिलमध्येच होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आता कारवाईची पुढील सूत्रे मुंबईतून हलणार आहेत.
मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या पूर्वीच दक्षता पथकाने कारवाई केली. मी १० वाजता पोहोचलो तेव्हा कारवाई आटोपली होती. तीन तिकीट निरीक्षकांविरूद्ध कारवाई झाली असून, पंचनाम्यावर माझी स्वाक्षरी घेण्यात आली आहे.
- संजय अमिन, मुख्य तिकीट तपासणी निरीक्षक, अमरावती