उपविभागीय अभियत्यांने घेतली ३० हजारांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: October 6, 2022 07:17 PM2022-10-06T19:17:25+5:302022-10-06T19:17:36+5:30
उपविभागीय अभियत्यांने ३० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
अमरावती : कामांचे देयक मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दर्यापूर येथील उपविभागीय अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात करण्यात आली. तेजकुमार वसंतराव येवले (५७) असे अटक करण्यात आलेल्या उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे.
एसीबीनुसार, तक्रारदाराच्या कंत्राटदार मुलाने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, दर्यापूर अंतर्गत नांदरून येथील सामाजिक सभागृह आणि नाचोना येथील रस्ता डांबरीकरणाचे काम केले. या दोन्ही कामांचे १६ लाख ८८ हजार ९९९ रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता तेजकुमार येवले यांनी त्यांच्याकडे ५५ हजारांच्या लाचेची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपये मागितले. यासंदर्भात कंत्राटदारांच्या वडिलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती घटकाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली.
दालनातच ट्रॅप
लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने एसीबीने गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. कंत्राटदाराकडून ३० हजारांची लाच स्वीकारताच एसीबीने उपविभागीय अभियंता तेजकुमार येवले याला अटक केली. या प्रकरणी तेजकुमार येवले याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक केतन मांजरे व अमोल कडू, विनोद कुंजाम, रोशन खंडारे, शैलेश कडू, सतीश किटुकले आदींनी केली.