व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्ताने गर्दी केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:48+5:302021-04-15T04:11:48+5:30
लोकमत इम्पॅक्ट चिखलदरा : विनापरवानगी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजनाच्या निमित्ताने शेकडो आदिवासींना एकत्र करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित करताच, ...
लोकमत इम्पॅक्ट
चिखलदरा : विनापरवानगी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजनाच्या निमित्ताने शेकडो आदिवासींना एकत्र करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित करताच, नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा तहसीलदार माया माने यांनी दिला. मेळघाटातील सातपुड्याच्या पर्वतराजीमुळे चिखलदरा तालुका दुर्गम ठरतो. त्याचा फायदा घेत काही पक्ष, संघटना, व्यक्ती, पदाधिकारी अशा स्पर्धा भरवित असल्याचे अलीकडे दिसून आले.
चिखलदरा तालुक्यात आठवड्यापासून अचानक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आदिवासींच्या सर्वात मोठ्या होळी सणातील यात्रा रद्द केल्या गेल्या. असे असताना काही पक्ष, संघटना, पदाधिकारी कुठल्याच प्रकारे नियमाचे पालन करीत नसल्याचे पुढे आले आहे. वाटेल त्या गावात कुठल्याच प्रकारची परवानगी न घेता व्हॉलीबॉल स्पर्धा भरविल्या जात असल्याचा प्रकार खुद्द सोशल मीडियावर पदाधिकारी वायरल करीत होते. शेकडोंच्या संख्येने आदिवासी एकत्र करून बक्षीस समारंभ केला जात होता. यात कोरोना त्रिसूत्रीचे पालन होत नव्हते. फोटोसेशनमध्ये तोंडाला मास्क न बांधणे, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्यात आला. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच तालुका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी व इतर आवश्यक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार माया माने यांनी दिला आहे
बॉक्स
गावसमित्या कुचकामी
कोरोनाकाळात गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, सचिव, तलाठी, शिक्षक अशा विविध प्रशासनातील संलग्न असलेल्यांनी कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास तात्काळ तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना कळविणे गरजेचे आहे. मात्र, मेळघाटात पदाधिकारीच नियम पायदळी तुडवित असल्याने हे कर्मचारी मूग गिळून गप्प बसले. परिणामी गावसमित्या कुचकामी ठरल्या आहेत.
बॉक्स
अनेकांना लागले निवडणुकीचे वेध
विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाना अजून वेळ असला तरी आतापासूनच अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत लागले आहेत. राज्य शासनाने कोरोनापासून नागरिकांच्या जिवांचे सुरक्षा करण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगत तो अंमलातही आणला. अशा स्थितीत चिखलदरा तालुक्यातील व्हॉलिबॉल स्पर्धा आदिवासींच्या जिवावर बेतणाऱ्या ठरल्या आहेत.
बॉक्स
कोरोना नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. गर्दी करून स्पर्धा कोणी घेऊ नये, असे पूर्वीच सांगण्यात आले. तरीसुद्धा स्पर्धा भरविल्यास यापुढे कारवाई केली जाणार आहे.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा