आठवडाभरात वीजबिल थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:09+5:302021-07-25T04:12:09+5:30
अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली. याशिवाय ...
अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली. याशिवाय जुलै महिन्यात पहिल्या २२ दिवसांत ३७८ कोटींच्या उद्दिष्टांपैकी ७७ कोटीच वसूल झाले. येत्या आठवडाभरात किमान ८३.५४ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अन्यथा कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे थेट निर्देश नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी शुक्रवारी दिले.
महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, भविष्यात थकबाकीदार ग्राहकांना उधारित वीज देणे महावितरणला शक्य नसल्याने थकबाकीदार वीज ग्राहकांकडून शंभर टक्के थकबाकी वसुलीचे निर्देश रंगारी यांनी दिले. महावितरणच्या विद्युत भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, उपमहाव्यवस्थापक (वित्त वे लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, भारतभूषण औगड, अनिरूध्द आलेगावकर, दीपक अघाव यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील ५ लाख ५० हजार वीज ग्राहकांकडून जुलै महिन्यात ३७८ कोटी वसुलीचे उद्दिष्टे देण्यात आली. त्यापैकी २२ दिवसात केवळ १६.४६ टक्केच वसुली झाली आहे. त्यामुळे पुढील ९ दिवसात ८३.५४ टक्के वसुलीचे टार्गेट पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याचे प्रादेशिक संचालक म्हणाले. याचाच भाग म्हणून काही अभियंतांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना प्रादेशिक संचालकाकडून करण्यात आल्या आहे.