गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:31+5:302021-09-10T04:18:31+5:30
अमरावती : यंदा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून ...
अमरावती : यंदा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. या तात्पुरत्या जोडणीच्या वीजवापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. मात्र त्यांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
तसेच वातावरणातील बदल बघता गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करावी. गणेश उत्सव मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी. मंडळांतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास त्या वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांत किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढावा. जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड द्यावा. तसेच स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करावी. गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.