अवैध मद्यनिर्मात्यांवरही तडीपारीची कारवाई
By admin | Published: April 21, 2017 12:19 AM2017-04-21T00:19:00+5:302017-04-21T00:19:00+5:30
राज्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी राज्याचे गृहखाते सरसावले आहे. त्यासाठी ग्रामरक्षक दलाची
गृहमंत्रालयाचे निर्देश : ग्रामरक्षक दलाची मदत घेणार
अमरावती : राज्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी राज्याचे गृहखाते सरसावले आहे. त्यासाठी ग्रामरक्षक दलाची मदत घेतली जाईल. अवैध दारू उत्पादनांवर अंकुश ठेवण्यासाठी नव्याने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता दारू विक्रेत्यांवरही हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र दारुबंदी (सुधारणा) अधिनियम २०१६ नुसार अवैध मद्यनिर्मिती व विक्री व्यवसाय करणाऱ्या इसमांवर तीन वेळापेक्षा अधिक गुन्हे नोंदविले असल्यास व शिक्षा झाल्यास त्याचेवर हद्दपारीची कारवाई केली जाईल. हद्दपारीच्या प्रस्तावासाठी पोलीस विभागाने कालमर्यादा विहित करावी. अशा कालमर्यादेत प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसुरीबाबत प्रशासकीय कारवाईचे निर्देश गृहविभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातील अवैध दारू उत्पादन, वाहतूक व विक्री रोखण्यासह या अवैध धंद्याचे उच्चाटनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासन राजपत्रात १६ जानेवारी २०१७ रोजी माहिती प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामस्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत.
यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील तरतुदीनुसारचे अवैध मद्य विक्री बाळगणे, वाहतूक करणे इत्यादी गुन्ह्यांबाबतची माहिती नजीकचे पोलीस स्टेशन अथवा संबंधित अधिकारी यांना ग्रामरक्षक दलाच्या सदस्याने देण्यासंदर्भातील तरतूद विहित करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
अवैध दारू उत्पादन व विक्रीसंदर्भात ग्रामरक्षक दलाकडून माहिती मिळताच पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाने १२ तासाच्या आत कार्यवाही करून गुन्हे दाखल करावेत, अशी स्पष्ट सूचना गृहखात्याने दिली आहे.
याशिवाय दारू पिऊन गावात गोंधळ घालणाऱ्या, मारामाऱ्या करणाऱ्या इसमांबाबत ग्रामरक्षक दलाकडून संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर मद्यपान केलेल्या इसमास नशा असेपर्यंत शक्य तितक्या लवकर ताब्यात घेवून त्याची प्रथमत: वैद्यकीय तपासणी करून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ च्या कलम ८५ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आहेत.
दारूविषयी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत व्यक्तीविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र संबंधित व्यक्तीकडून घेण्याबाबत कायद्यातील प्रचलित तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच सराईत गुन्हेगार व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलमानुसार हद्दपारीची आवश्यक कार्यवाही करावी, असे पोलीस विभागाला बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)