राज्यात वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:01 PM2021-11-23T12:01:01+5:302021-11-23T12:10:42+5:30
विदर्भात वनक्षेत्रानजीक गावांची संख्या ८ हजारांच्यावर आहे, तर अशा गावांना वीज जोडणी ही खांबांवरून वनक्षेत्रातून केली जाते. परिणामी उघड्या विजेच्या जिवंत तारांचा उपयोग वन्यजीवांची हत्या करण्यासाठी केला जातो.
गणेश वासनिक
अमरावती : गेल्या ५ वर्षांत वाघ, बिबटे व अन्य वन्यजीवांचा विद्युत प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात दुर्दैवी मृत्यू होत असल्याने वनविभागाने वीज कंपनी सोबत वर्किंग कमिटी स्थापन करून विद्युत प्रवाहाने होणारे वन्यजीवांचे मृत्यू किंवा हत्या रोखण्यासाठी दोन्ही विभाग एकत्रित काम करणार आहेत.
राखीव वनक्षेत्र किंवा व्याघ्रप्रकल्पामधून वीज कंपनीचा हवेत विद्युत पुरवठा अद्यापही कायम आहे, वनक्षेत्रालगतची गावे आणि शेतीला अशा प्रकारे वीजपुरवठा केला जातोय, त्यामुळे वनक्षेत्रात असणारे वाघ, बिबटे वा अन्य वन्यजीव विजेच्या स्पर्शाने किंवा विद्युत प्रवाह लावून वनक्षेत्रात वन्यप्राण्यांना ठार केले जात आहे. मध्यंतरी राज्यात विजेचा शाॅक देऊन १५ पेक्षा जास्त वाघ तर २५ च्यावर बिबटे या वन्यजीवांची हत्या करण्यात आलेली आहे. शेतीतील शेतपिकांच्या संरक्षणासाठी शेतबांधावर रात्रीच्या वेळेस जिवंत वीजप्रवाहाची तार लाऊन रानडुक्कर, नीलगाय, काळवीट या वन्यजीवांना मारण्यात येत असल्याने यावर उपाय म्हणून वनविभाग शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करत आहे, मात्र, यात फारसे यश विभागाला मिळालेले नाही, वीजप्रवाहामुळे वाघ, बिबट्याची शिकारसुद्धा करण्यात येते.
उघडी विजेची तार कारणीभूत
विदर्भात वनक्षेत्रानजीक गावांची संख्या ८ हजारांच्यावर आहे, तर अशा गावांना वीज जोडणी ही खांबांवरून वनक्षेत्रातून केली जाते. परिणामी उघड्या विजेच्या जिवंत तारांचा उपयोग वन्यजीवांची हत्या करण्यासाठी केला जातो. त्यामुळे वनक्षेत्रातून जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे रूपांतर एअरबंच केबल वा भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये करण्यासाठी माेहीम हाती घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे, त्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
संवेदनशील क्षेत्रात वीज वनकर्मचाऱ्यांची गस्त
ज्या वनक्षेत्रातून जिवंत वीजवाहिन्या गेल्या आहेत, अशा वनक्षेत्रात वाघ, बिबटे वन्यजीवांची संख्या अधिक आहे, अशा भागात सहजतेने वन्यजीवांस वीजप्रवाहांचा धोका संभावत आहे. अशा भागात वनविभाग आणि वीज कंपनीचे कर्मचारी संयुक्त गस्त करणार आहेत. याकरिता तालुका स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकार व उपअभियंता यांच्यात समन्वय ठेवला जाणार आहे.
विद्युत प्रवाहामुळे होणारे वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचारी आणि खबरी यास बक्षीस योजना आखण्यात आलेली आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या मृत्यूला आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)