दप्तराचे ओझे कमी न करणाऱ्या शाळांवर कारवाई
By admin | Published: December 28, 2015 12:13 AM2015-12-28T00:13:30+5:302015-12-28T00:13:30+5:30
उच्च न्यायलायाच्या आदेशानंतर दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासनामार्फत शाळांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
जितेंद्र दखने अमरावती
उच्च न्यायलायाच्या आदेशानंतर दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासनामार्फत शाळांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही शाळा विविध संकल्पना राबवीत दप्तराचे ओझे शक्य तितके कमी करीत आहेत. याकडे अद्यापही ज्या शाळांनी दुर्लक्ष केले, त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे.
दप्तराच्या ओझ्याचा गंभीर मुद्दा जानेवारी २०१५ पासूनच राज्यस्तरावर मांडला होता. पाठीवरच्या ओझ्याला औषध शोधू याच्या माध्यमातून विविध उपाययोजनांद्वारे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांचे अभिनव प्रयोग आदींविषयीची माहिती प्रसिद्ध केली होती.
या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी या विषयाला गांभीर्याने घेतले होते. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग पुन्हा दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कामाला लागले आहे. यापूर्वीच मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक घेतली होती. त्यात केवळ सूचना न मांडता दप्तराचे ओझे कमी करण्याचे विविध उपाय, मार्ग सूचविण्यात आले. त्यानुसार शाळांनीही पुढाकार घेत विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. मुख्याध्यापकाची कार्यशाळा, पालकांना स्रेहसंमेलनातून समुपदेशन यासह विविध उपाययोजना केल्यानंतर अद्यापही दप्तराचे ओझे कमी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. (प्रतिनिधी)