पाणी पुरवठ्यात कुचराई केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 09:30 PM2017-09-29T21:30:52+5:302017-09-29T21:31:12+5:30
राज्यातील नागरिकांना स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर आणि आरोग्यपूर्ण जीवनमान देण्यासाठी पाणी व स्वच्छतेच्या विविध योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील नागरिकांना स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर आणि आरोग्यपूर्ण जीवनमान देण्यासाठी पाणी व स्वच्छतेच्या विविध योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अधिकारी-कर्मचा-यांनीही या कायार्चे महत्व ओळखून गतीने कामे करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे दिले. कामचुकारपणा करणा-या अधिकारी- कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
विभागातील सर्व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन व स्वच्छता ही सेवा उपक्रम या योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी नियोजनभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, प्रधान सचिव संतोषकुमार, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार,झेडपीचे सीईओ की.एम अहमद , बीडीओ,व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले की, पाणी आणि स्वच्छतेचा संबंध थेट नागरिकांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या याबाबतच्या योजनांची अंमलबजावणी तत्काळ करावीत याचे गांभीर्य ओळखून ती पूर्ण करावीत. विलंब करणा-या, तसेच कामचुकार व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील कामे तत्काळ सुरु होणे आवश्यक होते. शासनाने या कामासंबंधी वेळोवेळी सर्व सूचना केल्या आहेत. असे असतानाही काही जिल्ह्यांकडून अपूर्ण व उशिराने प्रस्ताव येणे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
झेडपी भांडारगृहाची झाडाझडती
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी झेडपीतील भांडार गृहाची पाहणी करून स्वच्छता हीच सेवा मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.यावेळी भांडार विभागातील गठयामध्ये महत्वाचे दस्ताऐवज आहे. याकामाजातील जन्मकुंडल्या कपाट आलमारी, कापडा बांधून ठेवण्याची पध्दती आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे जुने जीर्ण व कागदावरील रेकॉर्ड हे संगणकात फिड करण्याचे निर्देश यावेळी लोणीकर यांनी दिले आहेत.यावेळी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे,उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,आ. वीरेंद्र जगताप,सभापती जयंत देशमुख,बळवंत वानखडे,सुशिला कुकडे,सदस्य प्रवीण तायडे,सीईओ के.एम अहमद,डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे,जे.एन.आभाळे,संजय इंग़ळे, संजय येवले आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना डावलले
पाणी पुरवठा योजना व स्वच्छतेचा आढावा बैठकीला आमदार, झेडपीचे सर्व पदाधिकारी यांना आमंत्रित केले नाही. यावर आ. वीरेंद्र जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. याची दखल घेऊन पाणी पुरवठा मंत्र्यांनी थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संपर्क साधून यापुढे अशा चुका न करण्याची खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले. दरम्यान बैठकीला सर्वांना बोलविण्याची सूचना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.