खासगी बसचालकांवर होणार कारवाई
By admin | Published: May 21, 2017 12:11 AM2017-05-21T00:11:28+5:302017-05-21T00:11:28+5:30
मध्यप्रदेशातील ‘खासगी बसेसचा शहरात मुक्काम’ या शीर्षकाखाली "लोकमत"मध्ये वृत्त प्रकाशित होताच....
अवैध वाहतूक : अन्यथा बसेस पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मध्यप्रदेशातील ‘खासगी बसेसचा शहरात मुक्काम’ या शीर्षकाखाली "लोकमत"मध्ये वृत्त प्रकाशित होताच सर्व वाहन चालकांची शनिवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात आली. त्यांनी महाराष्ट्राचा अधिकृत परवाना न दाखविल्याने त्यांना शेवटची वॉर्निंग देऊन सोडण्यात आले. मात्र, यानंतर ही वाहने महाराष्ट्राच्या हद्दीत सापडल्यास थेट जप्तीची कारवाई करण्याची तंबी देण्यात आल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.
"लोकमत"ने मध्यप्रदेशातील खासगी बसेसच्या धारणीतील अवैध फेऱ्यांबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ठाणेदार किशोर गवई यांनी मध्यप्रदेशातील वाहनांची कागदपत्रांची संपूर्ण तपासणी केली. त्यांचेकडे महाराष्ट्रात प्रवास करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे उघड झाले. त्यामुळे शनिवारी आलेल्या ‘त्या’ अवैध खासगी बसेसच्या चालकांना यानंतर महाराष्ट्रात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यानंतरही त्या वाहनांनी शहरात प्रवेश केल्यास थेट पोलीस ठाण्यात वाहने जमा करण्यात येणार असल्याची ताकिद त्यांना देण्यात आली आहे. "लोकमत"च्या दणक्याने झालेल्या या कार्यवाहीमुळे मध्यप्रदेश व कर्नाटक पासिंग काही खासगी बसेसच्या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
अकोट मार्गावरील वाहनांचे काय ?
मध्यप्रदेशाच्याच धर्तीवर महाराष्ट्रातीलच अनेक वाहने धारणी ते अकोट मार्गे धावत आहेत. या वाहनांकडेसुद्धा अधिकृत प्रवासी वाहतुकीच परवाना नसताना जीवघेण्या प्रवासाला घाटवळणावर सुरू आहे. पोलिसांनी याकडेसुद्धा लक्ष देण्याची मागणी जनता करीत आहे.