‘माइंड लॉजिक्स’ला अमरावती विद्यापीठाचा पुन्हा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:42 PM2019-03-29T19:42:43+5:302019-03-29T19:43:14+5:30
उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ठाण मांडून बसलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ कंपनीचे पंख छाटण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. यावर्षी उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा प्रणालीच्या नियमनाची जबाबदारी असलेल्या ‘माइंड लॉजिक्स’ या कंपनीने विद्यापीठाच्या तिजोरीला मोठे भगदाड पाडले. मोठ्या प्रती पेपर आणि प्रती परीक्षा या घोळातून कंपनीने चांगलीच रक्कम प्राप्त केली. विद्यार्थी संघटना, प्रसार माध्यमे आणि सिनेट सभेने या विषयावर सातत्याने लक्ष वेधल्यानंतर अखेरीस कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी या कंपनीकडून परीक्षेची कामे टप्प्याटप्प्याने काढून घेण्याचे सिनेट सभेत जाहीर केले होते. त्यानुसार मागील परीक्षेपासून प्री आणि पोस्ट परीक्षेची कामे कंपनीकडून अगोदरच काढून घेण्यात आलेली आहेत. त्यानंतर कंपनीकडे ऑनलाइन प्रश्नपत्रिका वितरण आणि डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे शिल्लक होती. आता उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून कंपनीकडून विज्ञान, विधी आणि फार्मसी या शाखांच्या परीक्षांचे डिजिटल व्हॅल्यूएशनची कामे काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या तीनही परीक्षांसाठी जुन्या प्रकारच्या उत्तरपत्रिका वापरल्या जाणार असून, मूल्यांकन ऑफलाइन होणार आहे. परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी माइंड लॉजिक्सला दणका देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
वर्षाकाठी ७० लाखांची बचत
डिजिटल व्हॅल्युएशनसाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेमागे २२ रुपये दर ‘माइंड लॉजिक्स’ आकारत होते. यामध्ये या तीनही शाखांच्या तीन लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होते. त्यामुळे आता ७० लाखांच्या आसपास रक्कम वाचणार आहे, शिवाय परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत ‘माइंड लॉजिक्स’ कडून होणारी दिरंगाईदेखील कमी होणार आहे.
विद्यापीठाच्या हितासाठी उचलले पाऊल
कुलगुरूंनी माइंड लॉजिक्सची गच्छंती करण्याचे आश्वासित केले. त्यानुसार आम्ही हे पाऊल उचलले आहे. यामुळे डिजिटल मूल्यांकनासाठी लागणारी रक्कमदेखील वाचणार आहे. पुढील परीक्षेपासून कंपनीकडून पूर्ण कामे काढून घेतली जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.