झाडांना आग लावणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:36 AM2018-04-10T00:36:01+5:302018-04-10T00:36:01+5:30
जिल्ह्यात झाडांना आगी लावणारी टोळी सर्वत्र सक्रिय झाली आहे. त्यामुळे जिवंत झाडांच्या बुंध्याला आगी लावून ते जाळण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. याला आळा घालण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरले असून, यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील डेरेदार वृक्ष झपाट्याने कमी होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात झाडांना आगी लावणारी टोळी सर्वत्र सक्रिय झाली आहे. त्यामुळे जिवंत झाडांच्या बुंध्याला आगी लावून ते जाळण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. याला आळा घालण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरले असून, यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील डेरेदार वृक्ष झपाट्याने कमी होत आहेत.
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अनेक रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता दाट सावलीच्या अमरावती-वलगाव मार्गावरील अनेक झाडे यापूर्वीच जमीनदस्त करण्यात आली. त्याचप्रमाणे वनविभागाच्यावतीने अनेकदा रस्ता करताना कंत्राटदाराला झाडे कापण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे एका विशिष्ट प्रकारच्या टोळीला तयार करून उन्हाळा लागला की, झाडाच्या बुंध्याला आगी लावण्याचे उपद्व्याप केले जातात. बुंध्याला आग लावलेले झाड जमीनदस्त होत असल्याचीही माहिती आहे. यादरम्यान मार्गावरून भरधाव जाणाऱ्या वाहनावर जळालेले झाड पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वलगाव-दर्यापूर, अमरावती-भातकुली, अमरावती-परतवाडा, अमरावती-वरूड या मार्गावर अशा प्रकारे झाडांना आगी लावून वनसंपत्ती नष्ट करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे.
शेतमालक लावतात धुऱ्याला आग
शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात झाली असून, धुºयावरील पालापाचोळा जाळला जात आहे. शेताच्या धुऱ्यावर आग लावल्यानंतर ती विझविण्यासाठी शेतात अनेकदा पाण्याची सोय नसते. त्यामुळे ती विझत नाही. त्याची बाधा इतर वृक्षांनाही होत असून, तेसुद्धा जळून खाक होतात. धुऱ्यावरचा पालापाचोळा जाळणे नियमाने गैर आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा लोकांवर नजर ठेवून किंवा त्यांनी पालापाचोळा जाळू नये, याकरिता जनजागृती करून वृक्षांचे महत्त्व पटवून देणे गरजेचे झाले आहे. वृक्ष वाचविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला जाणे अपेक्षित आहे.
झाडांच्या बुंध्यांना आगी लावणे गैरकायदेशीर आहे. असा प्रकार होत असेल, तर संबंधितांना शोधून एफआयआर करण्यात येईल. हा प्रकार रोखण्यासाठी सर्व कार्यकारी अभियत्यांना सूचना देण्यात येईल.
- विवेक साळवे,
प्रभारी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती.