मार्केटिंगच्या नावावर मुलींना फसविणारी टोळी सक्रिय
By admin | Published: March 22, 2016 12:29 AM2016-03-22T00:29:20+5:302016-03-22T00:29:20+5:30
विविध वस्तू थेट मार्केटिंगव्दारे विकल्या जातात. त्या वस्तू किस्तवारी पध्दतीने ग्राहकांना घरपोहच दिल्या जातात.
सावधान : वसुली प्रतिनिधी तुम्हालाही फसवू शकतो
वरूड : विविध वस्तू थेट मार्केटिंगव्दारे विकल्या जातात. त्या वस्तू किस्तवारी पध्दतीने ग्राहकांना घरपोहच दिल्या जातात. यामध्ये हप्तेवारीने वसुली करण्यासाठी युवा प्रतिनिधीची नियुक्ती करून वसुली होते. परंतु कंपनीचे प्रतिनिधी घरी जाऊन त्या घरातील मुलींना लक्ष्य करतात. दुपारच्यावेळी घरी कुणी नसताना युवतींना प्रेम जाळ्यात फसविण्याचे प्रकार सुरू आहे. अशाच एका मार्केटिंग प्रतिनिधीच्या घरी ग्रामीण भागातील युवती सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती.
स्पर्धेच्या युगात विविध कंपन्यांनी आपल्या वस्तू थेट मार्केटिंगव्दारे ग्राहकांना घरपोच विकण्याचा फंडा सुरू केला. याकरिता विक्री प्रतिनिधीची आकर्षक मानधन आणि कमिशनवर नियुक्ती करून घरोघरी पाठविण्यात येऊन किस्तवारी पध्दतीने ग्राहकांना विकण्यात येते. किस्तवारीची रक्कम वसुलीसाठी सदर प्रतिनिधी आठवड्यातून एक दिवस ग्राहकाकडे जातात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक असल्याने घरपोेच वस्तू मिळत असेल तर कुणीही खरेदी करतो. ठरलेल्या तारखेनुसार किस्तीची रक्कम घरी ठेवून आपल्या कामधंदयाला शेतावर निघून जातात. दुपारच्या वेळी घरी केवळ मुलेबाळे असतात.
यामध्ये तरुणीसुध्दा घरात असल्याने सदर वसुली प्रतिनिधी हे दुपारच्या वेळी घरी जाऊन युवतींना फसविण्याचे षड्यंत्र रचतात. प्रलोभने दाखवून प्रेमजाळ्यात अडकविण्याचे प्रकार घडत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून पळून जाण्याचे प्रकार घडतात. असाच प्रकार तीन दिवसांपूर्वी एका परिसरात उघडकीस आला असून कंपनीचे विक्रीप्रतिनीधी असलेल्याच्या खोलीत ग्रामीण भागातील दोन तरुणी काही सतर्क नागरिकांना आढळून आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु पोलिसांपुढे युवतीच्या पालकांनी समस्या निर्माण करून तक्रारीच्या भानगडीत पडायचे नाही, असा पवित्रा घेतला आहे. अखेर त्या तरुणांना नाईलाजाने सोडून देण्यात आले. परंंतु ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सतर्कराहण्याची सूचना देण्याची वेळ आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
भामट्यांना शिकविणार युवासेना धडा
तालुक्यात कुठेही ग्रामीण व शहरी भागातील तरुणींना प्रलोभने दाखवून फसविण्याचे प्रकार सुरु आहे. युवा सेनेच्या वतीने अशा भामट्यांना धडा शिकविण्यात येईल. असाच प्रकार तालुक्यात कुठेही दिसल्यास तात्काळ पोलीस व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्कसाधावा, असे आवाहन युवा सेनेचे तालुकाध्यक्ष मदन झळके यांनी केले आहे.