१३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:39 AM2019-09-05T01:39:41+5:302019-09-05T01:40:05+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी विभागीय आयुक्त यांच्याकडे शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी सादर केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारे सन २०१८-१९ चे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार ४ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये १३ शिक्षकांचा समावेश आहे. चार शिक्षकांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी विमलाबाई देशमुख सभागृहात झेडपीतर्फे गौरविण्यात येतील.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी विभागीय आयुक्त यांच्याकडे शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी सादर केली होती.
जिल्हा परिषदेच्या १३ आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार यादीच्या फाईलवर आयुक्तांनी ४ सप्टेंबर रोजी अंतिम शिक्कामोर्तब केले. गतिमान प्रक्रियेमुळे यंदा अनेक वर्षांनंतर आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला शिक्षकदिनाचा मुहूर्त लाभला आहे.
विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी शिक्षकांच्या नावांना मंजुरी प्रदान केल्यानंतर जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैक ी १२ तालुक्यांतून १३ शिक्षकांची सन २०१८-१९ या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या सर्व शिक्षकांना गुरूवारी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख यांच्या मान्यवरांच्या हस्ते ५ सप्टेंबर रोजी विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित समारंभात दुपारी ३ वाजता गौरविण्यात येणार आहे.
या शिक्षकांना मिळाला बहुमान
जिल्हा परिषद शिक्षक विभागाकडून दिला जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार २०१८-१९ चे निवड झालेल्या शिक्षकांमध्ये अनुपमा कोहळे अचलपूर, विलास बाबरे अमरावती, नीलेश उमक अंजनगाव सुर्जी, संदीप धोटे भातकुली, रोहिणी चव्हाण अचलपूर, प्रवीण जावरकर दर्यापूर, विनोद राठोड धामणगाव रेल्वे, रवींद्र घवळे धारणी, सचिन वावरकर चांदूर रेल्वे, नीलेश इंगोले मोर्शी, उमेश शिंदे नांदगाव खंडेश्र्वर,अजय अडीकने तिवसा आणि रमेश चांयदे वरूड या १३ शिक्षकांचा समावेश आहे.
या चौघांचा विशेष सन्मान
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ४ शिक्षकांना विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यातून उल्लेखनीय कार्याबद्दल आशिष पांडे, तर वरूड तालुक्यातून वर्ग व शाळेच्या सर्वांगीण विकासाकरिता विशेष योगदान दिले असल्याने नंदकिशोर पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे. शाळा डिजिटल करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील ज्ञानेश्र्वर राठोड व स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोर्शी तालुक्यातून मोहन निंघोट यांचा विशेष गौरव होणार आहे.