Amravati | आदर्श कोगे मृत्यूप्रकरणी अधीक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 10:46 AM2022-07-23T10:46:48+5:302022-07-23T10:48:32+5:30
नाक व तोंड दाबल्याने श्वासावरोध निर्माण झाला. त्यामुळे आदर्शचा मृत्यू झाला. परिमाणी, गाडगेनगर पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून अधीक्षक रवींद्र तिघाडे याला ताब्यात घेतले.
अमरावती : रामपुरी कॅम्पमधील पत्रकार कॉलनी स्थित विद्याभारती मागासवर्गीय वसतिगृहात झालेल्या आदर्श कोगे या १२ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी वसतिगृहाच्या अधीक्षकाविरुद्ध शुक्रवारी दुपारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र पांडुरंग तिघाडे (५०, रा. प्रियंका कॉलनी, अमरावती) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या अधीक्षकाचे नाव असून, त्याला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल व आदर्शचे वडील नीतेश कोगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.
येथील रामपुरी कॅम्प स्थित विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात आदर्श नीतेश कोगे (१२, रा. जामलीवन, ता. चिखलदरा) याचा संशयास्पद मृत्यू झाला. २१ जुलै रोजी सकाळी सहानंतर ही घटना उघड झाली होती. आपल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून, तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप नीतेश कोगे यांनी केला होता. त्यामुळे आदर्शचा मृतदेह गुरुवारी सायंकाळनंतर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. तेथे पाच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व सीसीटीव्हीच्या निगराणीत आदर्शच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, आदर्शच्या मृत्यूनंतर मोठा गहजब उडाला. शिक्षण संस्थाचालक, संचालकांसह वसतिगृहाशी संबंधित दोषींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडगेनगर पोलिसांनी अकोला जीएमसीला प्राथमिक शवविच्छेदन अहवालाची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तेथील वैद्यकीय चमूने तातडीने अहवाल पाठविला.
अमरावतीच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
नाक, तोंड दाबले म्हणून श्वास अडकला
शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक निष्कर्षानुसार नाक व तोंड दाबल्याने श्वासावरोध निर्माण झाला. त्यामुळे आदर्शचा मृत्यू झाला. परिमाणी, गाडगेनगर पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून अधीक्षक रवींद्र तिघाडे याला ताब्यात घेतले. ‘पप्पा, मुझे मारा’, असा मॅसेज आदर्शने वडिलांना टाकला होता. तर, बापलेकांचे व्हिडिओ कॉलवरून बोलणेदेखील झाले होते. वसतिगृृहातील विद्यार्थ्याने जर आदर्शला मारले असेल, तर तिघाडे यांनी आदर्शला त्यांच्याबरोबर ठेवायला नको होते. मात्र, तिघाडे यांनी तसे न केल्याने आदर्शला पुन्हा मारहाण झाली. त्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आदर्शचे वडील नीतेश कोगे यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून तिघाडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
तिघाडेसह चौघे ताब्यात
गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी तिघाडे यांच्या तक्रारीवरूनच आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, शुक्रवारी तेथील मुख्याध्यापक, केअरटेकर व स्वयंपाक्याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. तर, याप्रकरणी काही विद्यार्थ्यांचेदेखील बयाण नोंदविले जाणार आहे. आदर्शचा मृत्यू श्वासावरोधामुळे झाला असेल, तर त्याचे नाक, तोंड नेमके कुणी दाबले, यासाठी सखोल चौकशी आरंभण्यात आली आहे.