'एसटी'ला विठुराया पावला, तिजोरीत एक कोटीची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:07 AM2024-07-31T11:07:57+5:302024-07-31T11:23:54+5:30
पंढरपूर यात्रा : दहा दिवसांत मिळाले भरघोस उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाने यंदा आषाढी एकादशीनिमित्त २१३ विशेष बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या होत्या. यातून १ कोटी ११ लाख ७४ हजार ९६२ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने लालपरीला विठ्ठल पावला आहे. आषाढीसाठी जिल्ह्यातील आठ आगारांमधून ४१७ फेऱ्या झाल्या आहेत. एसटीने ४९ लाख ९३ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर ३७ हजार ७०४ भाविकांनी यंदाच्या वर्षी प्रवास केला असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्याही गावातून ४० प्रवासी मिळाल्यास त्या गावातून थेट बस पाठविण्याचे नियोजनही महामंडळाने केले होते. यामुळे अनेक प्रवाशांना पंढरपूरला जाण्याला सोयीचे झाले. एसटी महामंडळाने १३ ते २२ जुलै दरम्यान जादा बसेस सोडल्याने भाविकांना लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपले घर गाठता आले. यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आषाढी यात्रेमध्ये पंढरपूर येथे दाखल होतात. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या आठ बसस्थानकांतून जादा गाड्या सोडल्या होत्या.
महिला व ज्येष्ठांना प्रवास सवलत
जिल्ह्यातून पंढरपूर यात्रेकरिता पंढरपूर, पुणे, आळंदी आदी ठिकाणी अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या. महिला, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व ७५ वर्षावरील नागरिकांना ६५.९६ लाख रुपयांची सवलत योजने अंतर्गत एसटी महामंडळामार्फत देण्यात आली.
आकडे बोलतात
एकूण फेऱ्या : ४१७
एकूण किलोमीटर : ४९.९३ लाख
एकूण उत्पन्न : १ कोटी ११ लाख ७४ हजार ९६२ रुपये
एकूण प्रवासी : ३७,७०४
३७ लाखांची उत्पन्नवाढ
यंदा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेस सोडल्या होत्या. मागील वर्षी यात्रा महोत्सवात ७८.९२ लाखांचे उत्पन्न महामंडळाला झाले होते. यंदा १ कोटी १७ लाखांवर उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३७ लाखांचे उत्पन्न वाढले. यंदा प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांनी दिली.