कोरोनाग्रस्तांसाठी १०० खाटांची अतिरिक्त सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:39+5:30
जिल्ह्यात उपचार सुविधांची कमी पडू देणार नाही. मात्र, कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये, असे पालकमंत्री म्हणाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता येथील आयटीआय परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशिक्षण केंद्र व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत १०० खाटांची अतिरिक्त सुविधा तसेच सुपर स्पेशालिटीसाठी स्वतंत्र रस्त्याचीही निर्मिती होत आहे. ही कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिले. यासाठी सुमारे ६६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
पर्यायी मार्गामुळे कोविड रुग्णालयाकडे जाण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या रस्त्याचा वापर करण्याची गरज पडणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने ना. ठाकूर यांनी डीआरडीएच्या प्रशिक्षण केंद्र व नियोजित रस्त्याची जागा आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी राजपूत, तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते.
नागरिकांकडून त्रिसूत्री आवश्यक