आरोग्य, पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:12 AM2021-04-18T04:12:19+5:302021-04-18T04:12:19+5:30

शिरखेड : कोरोना महामारीचा समर्थ मुकाबला करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य आणि पोलीस विभागाने घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठा, ...

Additional stress on health, police department | आरोग्य, पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण

आरोग्य, पोलीस खात्यावर अतिरिक्त ताण

Next

शिरखेड : कोरोना महामारीचा समर्थ मुकाबला करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य आणि पोलीस विभागाने घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठा, अन्न औषध आणि दारूबंदी विभाग फक्त 'मंथली' साठीच येरझाऱ्या घालत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी धडपडणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असून, प्रशासनातील इतर विभाग कुंभाकर्णी झोपेत असल्याने पगाराला पुढे असणारी प्रशासनातील पुरवठा, अन्न औषध, दारूबंदी, ग्रामपंचायत विभागातील मंडळी 'मलिदा' लाटायला पुढे अन जबाबदारी घ्यायला मागे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

पुरवठा विभाग कोमात

स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर अंकुश ठेवणारा पुरवठा विभाग खाजगी व्यापाऱ्यांच्या बाबतीत अर्थपूर्ण कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे. बेफाम साठेमारी, अवास्तव दर आणि चढ्या भावाने विक्री यामुळे लॉकडाऊन कालावधीत सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असताना पुरवठा विभाग कानाडोळा करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दारूबंदी विभाग निस्तेज

दारू वाहतूक आणि अवैध विक्री करणारावर कारवाई करण्याचे सोपस्कार हे स्टेट एक्साईज विभागाचे काम असून चिरीमिरीमुळे या बाबीकडे दुर्लक्ष करण्याचा पराक्रम या विभागाकडून होत असून, महिन्याच्या सुरुवातीला वेतन घेण्यासाठी बिनबोभाट हजेरी लावणारे या विभागाचे कर्मचारी अवैध दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

अन्न औषध विभाग नाममात्र

कडक निर्बंध असताना गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने बंधनकारक असून यासाठी अन्न औषध विभाग कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही. पोलिसांनी बेकायदा गुटखा पकडायचा आणि अन्न औषध विभागाच्या ताब्यात द्यायचा. परंतु मूळ या विभागाचे कार्य हे नाममात्र असून स्वतःहून किती कारवाया केल्या. हा संशोधनाचा विषय असून, मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा किंवा होणारा काळाबाजार रोखणे हे याच विभागाचे कर्तव्य असून नाममात्र अस्तित्व असणारा हा विभाग कोमात गेल्याने वरकमाई जोमात सुरू असल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर

कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. परंतु, काही अपवाद वगळता आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अंगावर जबाबदारी टाकून ग्रामपंचायत प्रशासन नामानिराळे राहत असल्याने परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. गावातील बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणे, फवारणी करणे, स्वच्छता करणे अशा प्रमुख जबाबदाऱ्या या ग्रामपंचायतीच्या आहेत. परंतु दुर्दैवाने यात गटविकास अधिकारी यांची कचखाऊ वृत्ती आणि ग्रामसेवकांची चालढकल करण्याची प्रवृत्ती नागरिकांच्या मुळावर घाव घालत आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर असल्याने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Additional stress on health, police department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.