आदिवासी जननायक अजूनही उपेक्षेचा धनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:38 PM2017-11-14T23:38:55+5:302017-11-14T23:39:22+5:30
आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला.
मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला. ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारणाºया क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. या क्रांतिकारी जननायकाला कधी न्याय मिळणार, असा सवाल राज्यातील आदिवासींनी सरकारला विचारला आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बुधवारी त्यांची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाणार आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींचा वनसंपत्तीवरील अधिकार बाधित झाला. तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता. सन १८९४ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ, उपासमारीने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी नि:स्वार्थी अंत:करणाने समाजाची सेवा केली. ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करण्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता.
आदिवासी आमदार कधी घेणार दखल?
झारखंड, बिहार, ओडीशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशात आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना दैवत मानतो. झारखंडात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिवीराच्या नावाने राबविण्यात आली नाही. राज्यात सर्वपक्षीय २५ आदिवासी आमदार आहेत. त्यांनी दखल घेतल्यास बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एखादी योजना सुरू होऊ शकेल.
संसदेबाहेर दिल्लीत बिरसा मुंडा यांचा पुतळा आहे. इतर राज्यात बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रात एकही योजना नाही. त्यांच्या जयंतीला शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास बिरसा मुंडा यांना खºया अर्थाने आदरांजली वाहिली जाईल.
- जनार्र्दन नेवारे, सौंदळ