ब्रह्मपुरीच्या ई-वन वाघिणीच्या दहशतीखाली आदिवासी खेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:19 PM2019-07-04T12:19:17+5:302019-07-04T12:21:56+5:30

घरातील कुंपणात शिरून आठ वर्षीय बालिकेवर हल्ला चढवणारी ई-वन वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाघिणीला गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आणून डोलारच्या जंगलात सोडण्यात आले होते.

Adivasi village under the violence of Brahmapuri e-Tigress | ब्रह्मपुरीच्या ई-वन वाघिणीच्या दहशतीखाली आदिवासी खेडी

ब्रह्मपुरीच्या ई-वन वाघिणीच्या दहशतीखाली आदिवासी खेडी

Next
ठळक मुद्देरानडुकराची केली शिकार मेळघाटातील केकदाखेडाला तारेचे कुंपण

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : घरातील कुंपणात शिरून आठ वर्षीय बालिकेवर हल्ला चढवणारी ई-वन वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाघिणीला गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आणून डोलारच्या जंगलात सोडण्यात आले होते. मंगळवारी रात्री ८ वाजता तिने केकदाखेडा येथे बालिकेवर हल्ला चढविला. या घटनेने परिसरातील आदिवासी खेडी दहशतीखाली आली आहेत.
संगीता राधेश्याम दावर (रा. केकदाखेडा) या जखमी बालिकेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांसह धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. मुसळधार पावसात ही चमू त्या ठिकाणी पोहोचली. संपूर्ण परिसराची पाहणी केली तेव्हा वाघिणीचे पगमार्क आढळून आले. मंगळवारी रात्रीपासून व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे डेरा टाकला आहे

रानडुकराची केली शिकार
ब्रह्मपुरी येथून आणलेल्या ई-वन या वाघिणीने केकदाखेडा येथील बालिकेवर हल्ला केल्यानंतर नजीकच्या जंगलात एका रानडुकराची शिकार केल्याचे बुधवारी व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्या शिकारीजवळ ती सकाळी बसली होती.

१२ घरांच्या गावाला तारेचे कुंपण
मंगळवारच्या घटनेनंतर परिसरातील परसोली , कावडाझिरी, राक्षा, पाटकहू यांसह परिसरातील इतर गावांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे. बुधवारी केकदाखेडा या १२ घरांच्या गावाला तारेचे कुंपण लावण्याचा निर्णय व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने घेण्यात आला. व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित परिसरात असलेल्या या गावाचे पुनर्वसन व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने का करण्यात आले नाही, हा यक्षप्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. पायाभूत सुविधांपासून हे गाव पूर्णत: वंचित आहे.

पत्र्याच्या आवाजाने पिटाळले वाघाला
केकदाखेडा येथे घरामागच्या अंगणात संगीता उभी होती, तर आजोबा खाटेवर झोपले होते. वडील राधेश्याम घरात होते. वाघाने संगीतावर झडप घेताच तिने किंकाळी फोडली. म्हणून वडिलांनी धावतच बाहेर येऊन बघताच पट्टेदार वाघ दिसला. आडोसा म्हणून लावलेला टिनपत्र्यावर त्यांनी काठीने जोरदार प्रहार केल्याने वाघाने तिथून पळ काढला. यानंतर लगेच गावकरी धावले.

केकदाखेडा या गावाला बुधवारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह भेट दिली. त्या गावांतील पूर्ण १२ घरांना तारेचे कुंपण करण्यात येणार आहे. व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी तेथे तैनात आहेत.
- विलास कुलकर्णी, ठाणेदार, धारणी

Web Title: Adivasi village under the violence of Brahmapuri e-Tigress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ