आदिवासी विद्यार्थ्यांना लागली वाचनाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:16 AM2018-03-23T01:16:42+5:302018-03-23T01:16:42+5:30
मराठी भाषेचा लवलेश नसलेले आदिवासी कोरकू विद्यार्थी आता मराठी वाचनासह अंकगणित करू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मराठी भाषेचा लवलेश नसलेले आदिवासी कोरकू विद्यार्थी आता मराठी वाचनासह अंकगणित करू लागले आहे. तालुक्यातील जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांची प्रगती थेट त्यांच्या पाल्यांपुढे चावडी वाचनातून येऊ लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जात नसल्याचा आरोप आता खोडून निघू लागला आहे. आदिवासी पाड्यांमध्ये शनिवारी जि.प. शाळेचे विद्यार्थी चावडीवर येऊन पाल्यांपुढे वाचन-लेखन करतात. पाल्याची प्रगती पाहण्यासाठी प्रत्येक शनिवारी पालक आवर्जून या चावडी वाचनाला हजर राहतात. गौलखेडा बाजार केंद्र शाळांतर्गत वस्तापूर येथील जि.प. शाळेत दर शनिवारी चावडी वाचन घेतले जाते. गावाच्या मुख्य ठिकाणी होणाऱ्या उपक्रमामुळे पालकांना त्यांच्या पाल्याची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे, हे माहिती होते. चिखलदरा पं.स.अंतर्गत प्रत्येक शाळेत हा उपक्रम होत आहे. गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी यावर सर्वाधिक भर दिला आहे. केंद्रप्रमुख सविता भास्करे मुख्याध्यापक चिलाटी, सहायक शिक्षक अंकुश एच. राठोड, अंकुश यू. राठोड, अलोने, शिक्षिका दिवटे, कडू आदी शिक्षक उपक्रम राबवित आहेत.
चावडी वाचन या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत असल्याचे दिसू लागले आहे. त्याला आदिवासी पालकसुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे
- संदीप बोडखे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा