चंद्रभागा प्रकल्पग्रस्तांसमोर प्रशासन नमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:37 PM2018-03-04T22:37:08+5:302018-03-04T22:37:08+5:30
चंद्रभागा लघुबॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश आले असून, शेतजमिनीचा मोबदला व इतर मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे लेखी पत्र एसडीओ व्यंकट राठोड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
आसेगाव पूर्णा : चंद्रभागा लघुबॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश आले असून, शेतजमिनीचा मोबदला व इतर मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे लेखी पत्र एसडीओ व्यंकट राठोड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात पहिल्याच दिवशी निवेदनात २८ फेब्रुवारीला विष घेण्याचा अल्टिमेटम दिला असला तरी थेट २७ फेब्रुवारी रोजी एसडीओ व्यंकट राठोड यांनी मंडपात येऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. २८ फेब्रुवारी रोजी १२ वाजता आंदोलक ठरल्याप्रमाणे धरणावर विषाच्या बाटल्या घेऊन पोलिसांना चकमा देऊन निघाले असता, त्यांच्यावर तेथे दोनदा मधमाशांनी हल्ला चढविला. त्या हल्ल्यात सात आंदोलकांना दर्यापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी हलविण्यातसुद्धा आले होते.
आंदोलकांनी अखेर दर्यापूर-आसेगाव मार्गावर महिमापूर फाट्याजवळ आंदोलन मोर्चा वळविला. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजतापासून रास्ता रोको सुरू केले. या आंदोलनात ३०० ते ४०० प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी सहभाग नोंदविला. प्रकल्पग्रस्तांनी होळीसुद्धा दर्यापूर-आसेगाव मार्गावरच साजरी केली. आंदोलनस्थळी आ. रवि राणा व त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी भेट दिली. ग्रा.पं. गावनमुना ८ (अ) नुसार निवडा करून मोबदला तसेच इतर मागण्या मार्गी लावू, असे एसडीओंनी लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचे समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण म्हणाले.