जिल्हा बँकेवर प्रशासकीय व्यवस्था!
By admin | Published: December 28, 2015 12:33 AM2015-12-28T00:33:57+5:302015-12-28T00:33:57+5:30
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज सोमवार २८ डिसेंबरपासून प्रशासकीय व्यवस्थेच्या अखत्यारित जाणार आहे.
आज होणार निर्णय : सहकार वर्तुळाचे लक्ष
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज सोमवार २८ डिसेंबरपासून प्रशासकीय व्यवस्थेच्या अखत्यारित जाणार आहे. बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील २५ सदस्यीय संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ रविवारी संपुष्टात आला.
रविवारी शासकीय सुटी असल्याने प्रशासक किंवा अन्य पर्यायी व्यवस्थेचा कुठलाही निर्णय बँकेत पोहोचू शकला नाही.
सोमवारी २८ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक अमरावती जिल्हा बँकेच्या भविष्यकालीन पर्यायी व्यवस्थेवर शिक्कामोर्तब करतील. २५ ऐवजी २१ संचालकांची असलेली तरतूद आणि दिग्गजांचे गोठवण्यात आलेले मतदारसंघ, याविरोधात बँकेचे दोन संचालक न्यायालयात गेल्याने तूर्तास हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्ठात येत असताना निवडणूक कार्यक्रमाची प्रक्रिया राबविण्यात आली नाही.