प्रशंसनीय! दिवाळीत अंध, अपंग व कुष्ठरोग्यांना 'ते' गेल्या ३२ वर्षांपासून आपुलकीने वाढतात पुरणपोळीचे मोफत भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 08:36 PM2021-11-02T20:36:53+5:302021-11-02T21:00:35+5:30
Amravati News दिवाळीच्या दोन दिवसात शहरातील अंध, अपंग व कुष्ठरोगी नागरिकांना तसेच निराधारांना सुग्रास पुरणपोळीचे जेवण वाढण्याचा स्तुत्य उपक्रम अमरावतीतील विठ्ठलराव सोनवळकर यांनी चालविला आहे.
अमरावती : गेल्या ३२ वर्षांपासून राष्ट्रीय तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील दीन दुबळ्यांना मोफत मिष्टान्नाचे भोजन देण्याचा विठठलराव सोनवळकर यांचा उपक्रम सुरु आहे. या वर्षी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळी चे वाटप करण्यात येणार आहे.
शहरातील अंध, अपंगांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केलेले आहे. २६ जानेवारी १९८९ ला विठ्ठलराव सोनवळकर यांनी भाजीपोळी केंद्राची स्थापना केली. आज त्याला ३२ वर्षे पूर्ण झालेली आहे. शहरातील अंध, अपंग तसेच रुग्णालयात येणारे रुग्य व त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात जेवण मिळावे या उददेशाने त्यांनी सुरु केलेल्या या केंद्रात सेवेचा अखंड झरा वाहतो आहे. राष्ट्रीय सण तसेच भारतीय संस्कृतीतील मोठया सणांना शहरातील अंध अपंगांना मोफत पक्वानाचे वाटप करतात. ३२ वर्षात या सेवेत कधीच कोणताही खंड पडला नाही.
या सेवेबरोबरच शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच रुपयात तीन पोळ्या, व वाटीभर दाळभाजी हा त्यांचा नित्याचा उपक्रम आहे. गेल्या ३२ वर्षात महागाई आकाशाला भिडली परंतु विठठलरांच्या भाजीपोळी केंद्राची चव आणि धान्याचा दर्जा बदलला नाही. अनेक सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी येऊन त्यांच्या केंद्राची पाहाणी केली. व भरभरुन कौतुक केले. अनेकांनी पुरस्कार दिले परंतु अशा समाजशील उपक्रमासाठी शहराच्या मध्यवस्तीत एखादी नझुलची १० १० ची जागा त्यांना मिळु शकली नाही. ही शोकांतीका आहे. त्यामुळे कुणी आपली दखल घेवो अगर घेऊ नये आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत हे समाजकार्य असेच पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.
संत गाडगेबाबा विचारांनी भारावलेल्या व त्यांचे प्रत्यक्षात आचरणात आणणारे विठ्ठलराव सोनवळकर यांनी दिनांक ०२/११/२०२१ ते ०३/११/२०२१ या दोनदिवसात त्यांच्या भाजीपोळी केंद्रात पुरणपोळीचे वाटप ते करणार आहेत. या सर्व अपंगांनी सकाळी ११ ते २ या वेळात केंद्रात येऊन पुरणपोळी चे आस्वाद मोफत घेऊन आपल्याला आर्शीर्वाद देण्याचे आवाहन विठ्ठलराव सोनवळकर यांनी केले आहे.
बालपणी अन्नावाचुन उपाशी राहण्याची वेळ आपल्यावर आली. मंदिरातील देवापुढे ठेवलेला नैवेद्य खाऊन दिवस काढले. हे दिवस इतर कुणाच्याही वाटयाला येऊ नये या भावनेतुन हे सेवाकार्य सुरु केले आहे असे विठ्ठलराव सोनवळकर सांगतात. या कार्यात त्यांच्या कुटुंबाचे सहकार्य त्यांना मिळते.