आरटीई अंतर्गत १४२७ जणांचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:13 AM2021-07-31T04:13:42+5:302021-07-31T04:13:42+5:30
अमरावती : बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षण कायद्यान्वये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २४४ शाळांमध्ये आतापर्यंत १,४२७ विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित ...
अमरावती : बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षण कायद्यान्वये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २४४ शाळांमध्ये आतापर्यंत १,४२७ विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित झाले आहे. त्यामुळे उर्वरित जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीनुसार शनिवार, ३१ जुलैपर्यंतच एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे या मुदतीत इतरांना प्रवेश करून घेणे आवश्यक आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागा मुलांच्या प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ९ जुलै व त्यानंतर ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा ही मुदतवाढ देण्यात असून, ही मुदत आज संपणार आहे. जिल्ह्यातील यंदा आरटीई प्रवेशासाठी २४४ शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांमध्ये २०७६ जागा आहेत. याकरिता ५९१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले होते. सोडतीत यामधून १९८० विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करून घेणे आवश्यक आहे. संकेस्थळावरील माहितीनुसार शुक्रवारी सांयकाळपर्यंत १४२७ जणांचे प्रवेश निश्चित झाले असून, काही जणांचा तात्पुरता प्रवेश झाला आहे. परिणामी ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झाले नाही, अशांना मुदतीनुसार प्रवेशाची ही अखेरची संधी आहे.