अखेर कृषी अभ्यासक्रमाच्या ८५४ वाढीव जागांचे होणार प्रवेश; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 12:59 PM2022-10-14T12:59:29+5:302022-10-14T13:01:43+5:30
प्रवेश पूर्ववत होणार
अमरावती : राज्यात खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा ३८ कृषी महाविद्यालयात ८५४ वाढीव जागांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ववत होणार आहे. त्यामुळे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी एका पत्राद्वारे वाढीव जागाच्या प्रवेशाची मान्यता रद्द करण्यात आली होती. मात्र, गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी प्राप्त परिषदेच्या पत्रानुसार आता नव्याने प्रवेश प्रकिया राबविली जाणार आहे.
या वाढीव प्रवेश क्षमतेनुसार कृषी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांवर पाचव्या अधिष्ठाता समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने २२ सप्टेंबर २०२२ रोजी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कृषी परिषदेच्या १०८ व्या बैठकीत विनाअनुदानित खासगी कृषी महाविद्यालयांची सन २०२१-२०२२ याकरिता वाढविण्यात आलेली प्रवेश क्षमता मान्यता रद्द करण्यात आली होती. मात्र, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक उत्तम कदम यांनी गुरुवारी पाठविलेल्या पत्रानुसार वाढीव ८५४ जागांवर विद्यार्थ्यांचे कृषी अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश होणार आहे. पूर्ववतपणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे कळविले आहे.
३८ महाविद्यालयांची प्रवेशक्षमता वाढली...
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीने कृषी व संलग्न महाविद्यालये सुरू करण्यासाठी सुचविलेल्या शिफारशी चारही कृषी विद्यापीठांना लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली. त्याअनुषंगाने उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि व्यवस्थापन या चारही विद्याशाखांच्या सर्व ३८ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढविण्यात आली.