मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ‘निगेटिव्ह’ अहवालानंतर प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:36+5:302021-04-17T04:12:36+5:30
अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यालगत असलेल्या ...
अमरावती : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मध्यप्रदेश राज्याने याआधीच चाचणी करणे बंधनकारक केले आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारपासून दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना चाचणी गरजेचे आहे. मात्र अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक, रुग्णवाहिकांसाठी यातून सूट असेल. शहरात विनामास्क अनावश्यक फिरणाऱ्यांची फिरत्या पथकातर्फे दंडासोबतच ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यासोबतच जीवनावश्यक वस्तू वगळता सुरू असलेल्या इतर दुकाने आणि आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.
रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची उपलब्धता प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्णालयांना अत्यावश्यक असल्यासच कमी प्रमाणात रेमडेसिविरचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माफक दरात ही औषधे मिळण्यासाठी पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांमध्ये सुधारणा दिल्यास रेमडेसिविरचा उपयोग थांबविण्यात यावा. तसेच ऑक्सिजन पातळी वाढल्यास रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवावा, अशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्याचे जिल्हधिकारी म्हणाले. जिल्ह्यात कोरोनाचे डबल म्युटेशन झालेले नाही. जिल्ह्यातून पाठविलेल्या चाचण्यांचा याप्रकारे कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.
----------------
४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करावे
जिल्ह्यातील लसीकरण नियमित सुरू आहेत. लसीच्या पुरवठ्यावर लसीकरण केंद्र सुरू राहतील. लसीमुळे कोरोनाची लागण झाली तरी संसर्ग कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लसीकरणानंतरही हात धुणे, मास्कचा उपयोग, परस्परांमध्ये अंतर राखण्याचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केले.