अमरावती विभागातील ‘आयटीआय’च्या १८ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:56+5:302021-07-29T04:12:56+5:30
कॉमन अमरावती : सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली ...
कॉमन
अमरावती : सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरावती विभागातील ६३ शासकीय व २७ अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून १८,५८४ विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागांसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक एन.पी. येते यांनी दिली.
या संस्थांमध्ये एक व दोन वर्षे कालावधीचे ९१ व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या व्यवसायांचा अभ्यासक्रम हा उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी रचलेला असून, अभ्यासक्रम रचताना कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा विचार करण्यात आला आहे. प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना भेटी देणे, उद्योगधंद्यातील तज्ज्ञांचे व्याख्यान, कॅम्पस मुलाखती आयोजित करणे, प्रशिक्षण संपताच शिकाऊ उमेदवारी, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे यासारखे उपक्रम राज्यातील सर्वच संस्थांत राबवले जातात, असे येते यांनी सांगितले.
बॉक्स १
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही संधी
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून २ वर्षे कालावधीचा व्यवसाय अभ्यासक्रमात पूर्ण केल्यावर शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या दोन भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवाराला इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी संस्थेतून दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दोन भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांना दहावीची समकक्षता मिळते.
उद्योगांशी सामंजस्य करार
राज्यातील विविध नामांकित औद्योगिक आस्थापनांसोबत संचालनालयाने सामंजस्य करार केलेले आहेत. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून संस्थेतील प्रशिक्षण सुविधांची दर्जावाढ करणे, प्रशिक्षणार्थ्यांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे, ऑन द जॉब प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, निदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणे देणे, इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यासारखा बाबी प्रथम प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो.