अडसुळांचा निषेध; पीआय ठाकरेंच्या निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:28 PM2018-07-30T22:28:14+5:302018-07-30T22:28:59+5:30

बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्याविरूद्ध खासदार आनंदराव अडसूळ यांनी अ‍ॅट्रॉसिटी दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती-जमाती संरक्षण हक्क महासंघाने सोमवारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वाहनासमोर तासभर ठिय्या दिला. खासदार अडसूळ यांचा निषेध नोंदवित, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली.

Adsul; Demand for suspension of PI Thackeray | अडसुळांचा निषेध; पीआय ठाकरेंच्या निलंबनाची मागणी

अडसुळांचा निषेध; पीआय ठाकरेंच्या निलंबनाची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देमुद्दा राणांविरुद्धच्या अ‍ॅट्रासिटीचा : एससी-एसटी जमाती संरक्षण हक्क महासंघ आक्रमक; गगनभेदी घोषणा
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्याविरूद्ध खासदार आनंदराव अडसूळ यांनी अ‍ॅट्रॉसिटी दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती-जमाती संरक्षण हक्क महासंघाने सोमवारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वाहनासमोर तासभर ठिय्या दिला. खासदार अडसूळ यांचा निषेध नोंदवित, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली.
आ. राणांनी मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी राष्ट्रपतींकडे खा. अडसुळांविरूद्ध सीबीआय, ईडीकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर आ. राणांविरूद्ध खा. अडसूळ असे राजकीय द्वंद सुरू झाले, तर दोन दिवसांपूर्वी खा. अडसूळ यांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार देऊन आ. राणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे. तसेही काही वर्षांपासून आ. राणा अणि खा.अडसूळ यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून या वादात आणखीच भर पडली आहे. आ. राणांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होताच त्यांचे समर्थनार्थ एससी-एसटी जमाती संरक्षण हक्क महासंघाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करून आ.राणांविरूद्ध दाखल अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी रेटण्यात आली. दरम्यान, खा. अडसुळांनी पद आणि जातीच्या नावे गैरवापर केल्याबाबत त्यांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी केली. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी वरिष्ठांच्या दबावाला बळी पडून गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाकचेरीवर आ. राणांच्या समर्थनार्थ शेकडो मागासवर्गीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले होते. अमोल इंगळे, शैलेंद्र कस्तुरे, विजय मलिक, सुनील रामटेके, राजेश वानखडे, प्रवीण खंडारे, नितीन काळे, किशोर सरदार, आकाश सावळे, आशिष तायडे, प्रशांत इंगळे, नीलेश खोडखे, प्रशांत वाकोडे, राहुल तायडे, नितीन तायडे, आश्विन ऊके, विक्की वानखडे, अवधूत गवई, सूरज रासावणे, आशिष गावंडे, उत्तमराव बोरकर, विजय वानखडे, अक्षय वानखडे, गोलू गरूड, मयूर काळे, कुलदीप पवार, श्याम पवार, मनोज गजभिये, सिद्धार्थ बनसोड आदींनी खासदार अडसुळांच्या विरोधात गगनभेदी नारेबाजी देत जिल्हाकचेरीचा परिसर दणाणून सोडला.
बैठकीत शिरण्याचा मनसुबा, पोलिसांची तारांबळ
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे सोमवारी येथील जिल्हा नियोजन भवनात शिक्षकांच्या सहविचारी सभेसाठी आल्याची माहिती आ. राणा समर्थकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी नियोजन भवनाकडे मोर्चा वळविला. नियोजन भवन परिसरात ना. पाटील यांचे वाहन उभे होते. दरम्यान आ. राणा समर्थकांनी ना. रणजित पाटलांच्या वाहनांसमोर ठिय्या देत तीव्र घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर नियोजन भवनात सुरू असलेल्या बैठकीत शिरण्याचे मनसुबे पोलिसांनी हाणून पाडले. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली.
गृहराज्यमंत्री म्हणाले, योग्य कार्यवाही करू
अनुसूचित जाती - जमाती संरक्षण हक्क महासंघाने सोमवारी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना निवेदनाद्वारे आ. राणांविरूद्धचा अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा रद्दची मागणी केली. गाडगेनगर पोलिसांनी केवळ द्वेष भावनेतून गुन्हे दाखल केल्याची कैफियत विविध सामाजिक संघटनांनी ना. पाटील यांच्या पुढ्यात मांडली. कार्यकर्त्यांची भावना जाणून घेताना गृहराज्यमंत्र्यांनी यापूर्वी गाडगेनगर पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यांची शहानिशा केली जाईल, असा विश्वास दर्शविला. दोन्ही गुन्ह्यांची माहिती घेतली जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई करू, असे ना. पाटील म्हणाले.

मागासवर्गीयांवर अन्याय झाल्यास गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे गुन्हे दाखल करीत नाही. मात्र, असे काय राजकारण घडले की, खा. अडसुळांची तक्रार येताच आ. राणांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी दाखल केली. ठाणेदार ठाकरे यांचेवर तत्काळ निलंबनाची कारवाई व्हावी.
- अमोल इंगळे,
सामजिक कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळ

Web Title: Adsul; Demand for suspension of PI Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.