पीक कर्जवाटपावरून अडसुळ यांनी बँक अधिकाऱ्यांना खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:53 PM2018-06-17T22:53:24+5:302018-06-17T22:54:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : खरीप हंगाम सुरू झाला असून, पैशांची जुळवाजुळव न झाल्यामुळे शेतकरी पीक कर्जाकरिता बँकेत अर्ज करीत आहेत. बँकेचे अधिकारी अनावश्यक कागदपत्राकरिता शेतकºयांना त्रास देत असून नो-ड्युज दाखल्याची मनमानी फी बँक घेत असल्याची तक्रार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकारी व खा. आनंदराव अडसूळ यांच्याकडे केली होती. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावून खा. अडसूळ यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
पेरणीचा हंगाम सुरू झाला असताना शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. बी-बियाणेकरिता पैसे नसल्याने बँकेकडे कर्ज मिळण्याकरिता अर्ज करून वारंवार चकरा मारत आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असून शेतकºयांना नाहक कागदपत्र मागवून व बँकेच्या नो-ड्युज दाखल्याची मनमानी फी घेत असून वास्तविक नियमानुसार नो-ड्युज दाखल्यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलीही फी घेऊ नये, असे सर्कुलर असल्यामुळे बँका फी घेत असल्याची तक्रार मारोटकर यांनी केली. यावर खा. अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधकांना धारेवर धरून जिल्ह्यात एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास खबरदार बँक अधिकाऱ्यांना शिवसेना धडा शिकवेल, असा इशारा दिला. शेतकऱ्यांना बँकांनी सहकार्य न केल्यास बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा गंभीर इशारा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बैठकीत दिला. यावेळी उपस्थित युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे, तालुकाप्रमुख प्रवीण चौधरी, सरपंच गोकुळ राठोड, सुरेशराव राजगुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बँकेत अडचण आल्यास संपर्क साधा
बँकेत कर्जासंबंधी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी अनावश्यक कागदपत्रे मागितल्यास, नो-ड्युजकरिता पैसे मागितल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आव्हान प्रकाश मारोटकर यांनी केले आहे.