अडसूळ नवनीत राणांवर खटला दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:25 PM2019-07-26T13:25:15+5:302019-07-26T13:40:59+5:30
९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खोटी माहिती खा. राणा यांनी लोकसभा सभागृहासमोर ठेवून संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल केली. या बदनामीबाबत स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती अडसूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती:
सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याबाबतचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी केला. यामधील आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांचा नामोल्लेख लोकसभा सचिवालयाद्वारा सदस्यांना देण्यात आलेल्या खा. नवनीत राणा यांच्या भाषणाच्या प्रतीमधून वगळण्यात आला आहे. ८०० कोटी रुपयांच्या बँकेत ९०० कोटींचा झालेला घोटाळा व सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुनील भालेराव या नावाचा व्यक्ती खातेदार, शेअर होल्डर कर्जदार नसताना ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खोटी माहिती लोकसभा सभागृहासमोर ठेवून संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल करण्यात आली. खा. राणा यांनी केलेल्या बदनामीबाबत स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती अडसूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
काय आहे याची पार्श्वभूमी?
मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींच्या घोटाळ्यात ९१ हजार खातेदारांची शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांनी फसवणूक केली. याप्रकरणी या दोघांचेही बँक खाते सील करावे, घोटाळ्याची चौकशी व कारवाईची मागणी खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी (25 जुलै) केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे लोकसभेतील चर्चेदरम्यान केली.
बोगस कंपनीची नोंदणी करून व चिटफंडाच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लोकसभेत गुरुवारी विधेयक मांडण्यात आले. गोरगरिबांचा पैसा सुरक्षित राहावा, यासाठी खासदार नवनीत रवि राणा यांनी या विधेयकाचे समर्थन केले. यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी सभापतींच्या माध्यमातून या मागणीसाठी केंद्रीय वित्तमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुंबईत सिटी बँकेच्या १० शाखा व सर्वसामान्य, श्रमजीवी वर्गातील ९१ हजार खातेदार आहेत. या बँकेत बोगस कर्जाच्या माध्यमातून ९०० कोटींचा घोटाळा झाला आहे. यामुळे बँकेचे दिवाळे निघाले, तेव्हा अध्यक्ष आनंदराव विठोबा अडसूळ यांनी एका खातेदाराला सहा महिन्यांत फक्त एक हजाराची रक्कम काढता येईल, असे स्पष्ट केले. ही खातेदारांसाठी धक्कादायक बाब आहे. याचा धसका घेतल्याने पाच ते सहा खातेदारांचा मृत्यू झाल्याचा आरोप खासदार राणा यांनी केला.