भेसळयुक्त दुधाची विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:28 PM2018-08-17T22:28:43+5:302018-08-17T22:29:15+5:30
श्रावण महिना अनेक महत्त्वाचे सण घेऊन येतो. परंतु, सणासुदीच्या दिवसांत दरवर्षी दुधामध्ये भेसळ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. शहरात मागील वर्षीही एका डेअरीवर भेसळयुक्त दुधाचा साठा एफडीएला आढळून आला होता. आतादेखील अन्न प्रशासन विभागाने नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविल्यास दुग्धविक्री करणाऱ्या खासगी डेअरींचे पितळ उघड पडेल.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्रावण महिना अनेक महत्त्वाचे सण घेऊन येतो. परंतु, सणासुदीच्या दिवसांत दरवर्षी दुधामध्ये भेसळ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. शहरात मागील वर्षीही एका डेअरीवर भेसळयुक्त दुधाचा साठा एफडीएला आढळून आला होता. आतादेखील अन्न प्रशासन विभागाने नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविल्यास दुग्धविक्री करणाऱ्या खासगी डेअरींचे पितळ उघड पडेल.
मिठाईसाठी दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. शहरात ५० पेक्षा जास्त नोंदणीकृत खासगी डेअरी आहेत. या ठिकाणी दुधात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. त्याकारणाने दुधातील (एसएनएफ) सॉलिड नॉट फॅटचे प्रमाण कमी होते. ही भेसळच आहे. विशिष्ट प्रकारचे केमिकल टाकूनसुद्धा दुध तयार केले जात आहे. हा प्रकार आरोग्याला अतिशय घातक आहे. खासगी डेअरींमधून विक्री होणाºया दुधाचे नमुने घेऊन ते जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले, तर कशा प्रकारची भेसळ केली जाते, हा प्रकार उघड होण्यास मदत होईल.
मागील वर्षी सातुर्णा येथील एका बर्फ कारखान्यात गंजलेल्या ड्रममध्ये दुधाचा बर्फ करून ते साठवून ठेवले होते. या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाºयांनी धाड टाकून अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. असाच प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. निम्न दर्जाच्या दुधाची नेहमीच विक्री होत आहे. मात्र, अन्न प्रशासन विभाग नियमित कारवाया करीत नसल्याने डेअरींमधून अशा प्रकारच्या कमी दर्जाच्या दुधाची विक्री होत आहे. याकडे अन्न विभागाने लक्ष दिल्यास मोठ्या प्रमाणात दुग्धसाठा जप्त होऊ शकतो.
कशी केली जाते दुधात भेसळ?
भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, डिटर्जंट पावडर, युुरिया आदी पदार्थ मिसळतात. या भेसळीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात.
दूधाची माप वाढल्यामुळे त्यातील एनएसएफ ( घनपदार्थ विरहित स्निग्ध) कमी होेते. हे टाळण्यासाठी त्यामध्ये लॅक्टोज, साखर, ग्लुकोज तसेच स्टार्च, मीठ, युरिया, स्कीम्ड मिल्क ( दूध पावडर) मिसळले जाते. ग्रामीण भागात शक्यतो एकाच वेळी दूध संकलित केले जाते. ते टिकून राहण्यासाठी इतर पदार्थांची भेसळ केली जाते.
भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम
आयसीएमआरच्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होेऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने मूत्रपिंड, हृदय, यकृत निकामी होऊ शकते. कॉस्टिक सोड्यामुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे लायसीन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीरवाढीवर त्याचा परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते.
भेसळयुक्त दुधामुळे पोटाचे विकार, आतड्यावर सूज तसेच फूड पॉयजनिंग होऊ शकते तसेच यकृताचे विकार तसेच हेपिटायटीससारखे आजार होण्याची शक्यता असते. अनेक वर्षानंतर कर्करोगही होऊ शकतो.
- राजेश मुंदे, एमडी मेडिसीन