नुकसानीच्या पाहणीसाठी यशोमती ठाकूर बांधावर; तत्काळ पंचनाम्याचे प्रशासकीय यंत्रणेला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 12:20 PM2022-07-26T12:20:01+5:302022-07-26T15:49:15+5:30
ॲड. यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीसह अमरावती तालुक्यातील काही गावांचा पाहणी दौरा केला.
अमरावती : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती ओढवली आहे. विदर्भाला या अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामध्ये नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात झाली असून, शेतकऱ्यांची शेती अक्षरश: भुईसपाट झाली आहे, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर झालेल्या नुकसानग्रस्त भागाची तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी असे निर्देश माजी पालकमंत्री, आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी यंत्रणांना दिले आहेत.
अमरावतीत झालेल्या अतिवृष्टी व ओलावलेल्या पूर परिस्थितीच्या पाहणी करण्याकरिता. माजी मंत्री, माजी पालकमंत्री, आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीसह अमरावती तालुक्यातील काही गावांचा पाहणी दौरा केला.
रोहणखेडा, नांदुरा, देवरा, सावंगा, अंतोरा, यावली शहीद या गावांमध्ये भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.