१४ व्या वित्त आयोगातील विकास कामांचा लाभला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 12:23 AM2016-01-06T00:23:29+5:302016-01-06T00:23:29+5:30
शहरात काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या विकास कामांमुळे नगरसेवक चिंतीत असताना आता १४ व्या वित्त आयोगातील अनुदानातून विकास कामांचा सपाटा सुरू झाला आहे.
९२ कामे मंजूर : शासन निर्णयानुसार विकास कामांची निवड
अमरावती : शहरात काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या विकास कामांमुळे नगरसेवक चिंतीत असताना आता १४ व्या वित्त आयोगातील अनुदानातून विकास कामांचा सपाटा सुरू झाला आहे. त्यामुळे चिंतातूर नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. एकूण १८३ कामांचा यात समावेश असून ९२ विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे विकास कामे कोणत्या निधीतून करावी, हा प्रश्न नगरसेवक, प्रशासनाला देखील उपस्थित झाला होता. मात्र १४ व्या वित्त आयोगाचे ३६ कोटी रुपये प्राप्त झाल्यामुळे बराच दिलासा मिळाला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शासन निर्णयानुसार या अनुदानातून विकास कामे समाविष्ट करण्यासाठी सदस्यांकडून यादी मागविली होती. त्यानुसार प्रभागनिहाय विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यापूर्वी सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान वितरीत केले जाणार आहे. विकास कामे घेताना मूलभूत सोई सुविधांचा कामांना अग्रक्रम देण्याची नियमावली आहे.
महापालिका बांधकाम विभागाने प्राप्त शासन अनुदानानुसार विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविली आहे. १४ व्या वित्त आयोग अनुदानाचे दोन टप्पे प्राप्त झाले असल्याने त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे. विविध विकास कामांच्या एकू ण २५० निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२० कामे प्रक्रियेत आहेत. शासन अनुदानातून होणाऱ्या कामांचे देयके त्वरेने मिळत असल्याने ही कामे घेण्यासाठी कं त्राटदारांच्या जणू उड्या पडू लागल्याचे चित्र आहे. ३५ कोटी ८७ लाख ९६ हजार ५१४ रूपये प्राप्त अनुदानातून १ कोटी २९ लाख ८८ हजार ५२८ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. चालूवर्ष नगरसेवकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे विकासकामांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)