महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी मागितले प्रतीज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:25+5:302021-09-22T04:15:25+5:30
अमरावती : पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने अमरावती महापालिकेला पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनासाठी डेडलाईन निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने ...
अमरावती : पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाने अमरावती महापालिकेला पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनासाठी डेडलाईन निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने महानगरातील घनकचऱ्याचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. राष्ट्रीय हरित लवादात सोमवारी तारीख झाली असून, महापालिकेला प्रतीज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.
महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनात दिरंगाई केल्याबाबत येथील बुधवारा परिसरातील गणेश अनासाने यांनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली होती. तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाला ४७ कोटींचा दंडदेखील सुनावला. मात्र, हरित लवादाच्या निर्णयाविरूद्ध महापालिकेेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हल्ली सर्वोच्च न्यायालयाने ४७ कोटींच्या दंडाबाबत स्थगनादेश दिला असला तरी घनकचरा व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजनाची सक्ती महापालिकेला दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादात महापालिकेची ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. २० सप्टेंबर रोजी झालेल्या तारखेवर राष्ट्रीय हरित लवादाने घनकचरा व्यवस्थापनाविषयी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचाआढावा घेतला आहे. सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत साचून असलेल्या कचऱ्याबाबत लवकरच नियोजन करावे लागणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न किती दिवसात मार्गी लागेल, यासाठी महापालिकेला प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय हरित लवादात सादर करावे लागणार आहे.
----------------
पर्यावरण संवर्धनासाठी योग्य तो पुढाकार घेण्यात येत आहे. कचरा, घनकचऱ्याचे नियोजन केले जात आहे. गत काही महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आल्याने राष्ट्रीय हरित लवादा समाधानी आहे. लवकरच घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यात येईल.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका
--------------------
घनकचरा व्यवस्थापनावर एक नजर....
- अकोली येथे १०० मेट्रिक टन घनकचरा प्रकल्प कार्यान्वित
- सुकळी येथे २०० मेट्रिक टन घनकचरा प्रकल्प सुरू
- सुकळी येथे १ लाख ४० हजार क्युबिक मीटर जुना कचऱ्याचे नियोजन प्रस्तावित