सावंगीत संपूर्ण दारूबंदीचा ठराव
By admin | Published: October 30, 2015 12:32 AM2015-10-30T00:32:35+5:302015-10-30T00:32:35+5:30
येथे अवैध दारुविक्रीला उधाण येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे.
नागरिक सरसावले : समितीचा पुढाकार
सावंगी (जिचकार) : येथे अवैध दारुविक्रीला उधाण येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. शाळकरी मुलेसुध्दा दारुच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. अनेकवेळा या गावातील महिला बचत गट, ग्रामपंचायत तसेच तंटामुक्त गाव समितीने याबबात पाठपुरावा करुनही दारुबंदी होत नाही. याला पोलिसांचे अभय असल्याची चर्चा आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पहिली सभा घेऊन गावात दारुबंदीचा शेकडो ग्रामस्थांसमक्ष ठराव घेतला असून वरुड ठाण्यात निवेदन देण्यात आले.
अवैध दारुविक्रेत्यांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचे सांगण्यात येत असल्याने महिला बचत गट तसेच सर्वसामान्य नागरिकांनी दारू विक्रीला मज्जाव केला. खोट्या तक्रारी देणे, विरोध करणाऱ्या नागरिकांच्या घरावर हल्ले करण्याचा प्रकार घडतो. काही दिवसांपूर्वी महिलांनी पुढे येऊन दारुविक्रीला बंदी घालण्याचा प्रयत्न केला असता मारझोडीचे प्रकार घडले होते. उलट महिलांविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती.
अवैध दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग पावण्याचे प्रकार घडतात. तर वारंवार याबाबत तक्रारी करूनही काहीकाळ शांतता प्रस्थापित होते आणि नंतर पुन्हा 'जैसे थेच' अवैध दारूविक्रीला उधाण येते. याकरिता ग्रामपंचायत, महिला बचत गट, तंटामुक्ती गाव समितीने अनेकवेळा तक्रारी केल्यात. मात्र यावर अंकुश लावण्यात पोलीस हतबल झाले आहे. नवनियुक्त तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नंदलाल निंभोरकर यांनी सभा बोलावून सावंगीतील दारूबंदीचा ठराव घेतला असून पोलिसांना ठरावाची प्रत देण्यात आली आहे. परंतु पोलीस ही बाब किती गंभीरतेने घेणार याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले असून पोलिसांना याबाबत माहिती दिली असता विक्री करणारे एक दोन बॉटल विकत असल्याने सर्रास विक्री करताना दिसून येत नाही. विक्रेत्याकडे पेट्या आढळल्यास कारवाई करणे सुकर होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु उपसपंच, महिला बचत गट आणि तंटामुक्त गाव समिती तसेच शेकडो महिलांच्या सहिनिशी पोलिसांना निवेदन दिले असून आठ दिवसांत दारू बंदी झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)