स्वस्तात मस्त 'कार्बन नॅनो ट्यूब', भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीचं भन्नाट संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 07:35 PM2019-06-27T19:35:00+5:302019-06-27T19:36:14+5:30
अमरावती विद्यापीठाचे पाठबळ : निकिता डोळस हिने दाखविली राष्ट्रीय परिषदेत चमक
गणेश वासनिक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रचलित दरापेक्षा १६ पटींनी कमी किमतीत कार्बन नॅनो ट्यूब निर्मितीचे संशोधन विद्यार्थिनीने केले आहे. निकिता विलास डोळस (रा. चांदूर रेल्वे) असे या संशोधकाचे नाव. ती एम.एस्सी. भौतिकशास्त्राच्या अंतिम वर्षाला विद्यापीठात आहे. संशोधनाची दखल घेत त्याबद्दलचे पेपर विद्यापीठात पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत समाविष्ट करण्यात आले होते. प्रतिभा सुविधांची मोताद नसते, हे सामान्य कुटुंबातील निकिताने पुन्हा सिद्ध केले आहे.
पावडर स्वरूपातील कार्बन नॅनो ट्यूबचे कम्पोझिट केल्यानंतर अनेक पदार्थांची गुणवत्ता वाढविता येते. कर्करोगाच्या औषधांमध्ये त्याचा वापर वाहक म्हणून होतो. सौरऊर्जा पॅनल टणक करण्यासह अनेक ठिकाणी त्याचा वापर होतो. मात्र, एक ग्रॅम कार्बन नॅनो ट्यूची सध्याची किंमत साधारणपणे १० हजार रुपये आहे. निकिताने विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत एवढ्याच वजनाच्या कार्बन नॅनो ट्यूबची किंमत ५०० ते ६०० रुपये इतकी कमी पातळीवर आणली. म्हणजे तब्बल १६ पटींनी किंमत कमी झाली आहे. हे नॅनो ट्यूब वैद्यकीय क्षेत्रासाठी मल्टिपर्रपज असून, व्हॅक्सिनेशन, फ्यूअल सेल, कम्प्यूटर, सौरऊर्जा, शेती, औषधी, पाणी शुद्धीकरण, फायबर मटेरिअल अशा अनेक लोकोपयोगी क्षेत्रांमध्ये त्याचा वापर होतो.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘अभिनव पदार्थ व साधने’ या विषयावर २४ व २५ जून रोजी राष्ट्रीय परिषद पार पडली. यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी हजेरी लावली. या परिषदेत निकिता डोळस हिने कार्बन नॅनो ट्यूब या तिच्या संशोधनावर पेपर प्रेझेंटेशन केले. त्याची निर्मितिप्रक्रिया सोपी करून स्वस्तात मिळविता येऊ शकते, असा दावा निकिता डोळस हिने पेपर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून केला आहे.
गरिबाच्या घरी विद्वत्तेची श्रीमंती
चांदूर रेल्वे येथील रहिवासी निकिताचे वडील विलास डोळस हे भाजीपाला विक्री करतात, तर आई शीला गृहिणी आहे. तिला मोठा भाऊ आहे. परिस्थिती जेमतेम असलेल्या या कुटुंबाने निकिताच्या स्वप्नांना भरारी दिली. या नव्या संशोधनाच्या माध्यमातून तिने त्यांचे पांग फेडले.
प्रयोगशाळेतील संशोधनावर कौतुकाचा वर्षाव
प्रयोगशाळेत कार्बन नॅनो ट्यूब हे संशोधन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी पहिले ठरले आहे. तिने सादर केलेल्या पेपर प्रेझेंटेशनवर अनेक संशोधकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. अमरावती विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख एस.के. ओमनवार, सहायक प्राध्यापक संदीप वाघुळे यांचे निकिताला पाठबळ मिळाले. शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून बी.एस्सी. पूर्ण केले.
निकिता तिच्या संशोधनाबद्दल पेटेंट प्रक्रिया करू शकते. एमएस्सी स्तरावर या संशोधनासाठी विद्यापीठ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांना अभिनव पद्धती (इन्नोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस) चे संशोधनाला येथे वाव आहे.
- संदीप वाघुळे, सहायक प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ