१८ तासांनंतर अखेर सापडला चिमुकल्या स्वराजचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:50 PM2019-01-25T22:50:53+5:302019-01-25T22:52:05+5:30

कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातादरम्यान आईसह फेकल्या गेलेल्या स्वराजचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने शक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नदीपात्राबाहेर काढण्यात आला. मृतदेह नदीपात्राच्या तळाशी रुतलेल्या लाकडी पाटामध्ये अडकला होता.

After 18 hours, body of Swaraj was found near Chimukala | १८ तासांनंतर अखेर सापडला चिमुकल्या स्वराजचा मृतदेह

१८ तासांनंतर अखेर सापडला चिमुकल्या स्वराजचा मृतदेह

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न : जिल्हा प्रशासनाची मात्र अनास्था

सुरज दहाट/रितेश नारळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा/कुऱ्हा : कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातादरम्यान आईसह फेकल्या गेलेल्या स्वराजचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने शक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नदीपात्राबाहेर काढण्यात आला. मृतदेह नदीपात्राच्या तळाशी रुतलेल्या लाकडी पाटामध्ये अडकला होता. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील विठ्ठल नारायण कुरवाडे या धाडसी तरुणाने नदीत उडी घेऊन स्वराजचे पार्थिव नदीपात्राबाहेर काढले.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची प्रतीक्षा करून थकलेल्या कौंडण्यपूर व लगतच्या गावातील ग्रामस्थांनी चिमुकल्या स्वराजचे पार्थिव पित्याच्या हातात देताच त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. ग्रामस्थांनी त्या चिमुकल्याचे पार्थिव पाण्याबाहेर काढेपर्यंतही प्रशासनाचे ‘रेस्क्यू’ पथक न पोहोचल्याने जिल्हा प्रशासनाच्या असंवेदनशीलतेविषयी संताप व्यक्त करण्यात आला. रेस्क्यू पथक वेळेवर पोहोचले असते तर चिमुकल्या स्वराजचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी उमटली. स्वराज दिवाकर राजूरकर (वय ४ वर्ष) रा.विश्वकर्मा कॉलनी, चांदूर रेल्वे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
चांदूररेल्वच्या रहिवासी विभा दिवाकर राजूरकर (३५) या त्यांच्या चार वर्षीय विराज व स्वराज या जुळ्या मुलांसमवेत भाऊ नीलेश डहाके यांच्याकडे जळगाव बेलोरा (जि.वर्धा) येथे गेल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी बहीण विभा व दोन भाच्यांना घेऊन नीलेश चांदूर रेल्वेकडे निघाला होता. दरम्यान, कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर नीलेशच्या दुचाकीस एमएच ०१ एल ४५०९ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. त्या धडकेने नीलेश व विराज हे दुचाकीसह पुलाच्या कठड्यावर जाऊन पडले, तर विभा व स्वराज कठड्यावरून नदीपात्रात फेकले गेले होते . अपघात घडताच नीलेश बेशुद्ध झाला. दरम्यानच्या कालावधीत विभा राजूरकर यांना तेथे असलेल्या बोटीच्या साहाय्याने नदीपात्राबाहेर काढण्यात आले. मात्र, स्वराज वाहून गेला. त्याला शोधण्यासाठी बचावकार्य आरंभण्यात आले आहे. गुरुवारी अंधार होईपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. मात्र रात्र झाल्यामुळे बचावकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी सकाळी कौंडण्यपूर येथे मुसळधार पाऊस पडल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण झाला. पाऊस थांबल्यानंतर गावकºयांनी परत पाण्यात उड्या घेतल्या. अखेर काही अंतरावर वर्धा नदीच्या खोल पाण्यात शिरवलेल्या दुर्गा देवीच्या पाटाखाली स्वराजचा मृतदेह सापडला.
मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
या अपघाताप्रकरणी कुऱ्ह पोलिसांनी एमएच ०१ एल ४५०९ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाचा चालक आकाश बंडूजी दमाये (२६, रा. नांदपूर, ता. आर्वी, जि. वर्धा) याचेविरुध्द कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अ भादंविसह सहकलम १३४, १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शुभम ज्ञानेश्वर डहाके ( जळगाव बेलोरा) यांनी तक्रार दाखल केली.
वडील कौंडण्यपुरात, आई रुग्णालयात
अपघाताची माहिती मिळताच दिवाकर राजुरकर यांनी गुरुवारी रात्रीच कौंडण्यपूर गाठले. त्यांची पत्नी विभा यांना आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवार दुपारपर्यंत चार वर्षीय विराज आईसोबत रुग्णालयात होता. शुक्रवारी दुपारी स्वराजचा निष्प्राण मृतदेह हाती येताच वडील दिवाकर यांनी हंबरडा फोडला. स्वराज -स्वराज अशा हाक देत ते नि:शब्द झाले होते.
रेस्क्यू टीम पोहोचलीच नाही
वर्धा नदीच्या पात्रात पडलेल्या स्वराजचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी गुरुवारीच संपर्क करण्यात आला. स्वराजचे नातेवाईक व कौंडण्यपूर ग्रामस्थांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनीही संपर्क साधला. मात्र रेस्क्यू टीम घटनास्थळी आलीच नाही. अखेर गावकऱ्यांनीच बोटीच्या सहायाने बचावकार्य केले.

बचावकार्य करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रचंड दिरंगाई केली. रेस्क्यू टीम घटनास्थळी गेली, असे मला सांगण्यात आले. वर्धा नदीतील गाळ काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
- सुनील देशमुख, आमदार, अमरावती

शुक्रवारी पहाटेच आपत्ती व्यवस्थापन पथक कौंडण्यपूरला पाठविण्यात आले. त्या पथकात प्रशिक्षित कर्मचाºयांचा भरणा होता. शिवाय एसडीओ, तहसीलदार घटनास्थळी होते.
- नितिन व्यवहारे, आरडीसी.

Web Title: After 18 hours, body of Swaraj was found near Chimukala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.