३८ दिवसांनंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला स्थगिती
By उज्वल भालेकर | Published: November 30, 2023 08:18 PM2023-11-30T20:18:36+5:302023-11-30T20:19:03+5:30
शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते.
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ३८ दिवसांनंतर गुरुवारी आपल्या काम बंद संपाला स्थगिती दिली. परंतु आठ दिवसांमध्ये जर आरोग्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर १४ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आंदोलन तीव्र करून आक्रोश मोर्चाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. जिल्ह्यातील जवळपास १३५२ अधिकारी, कर्मचारी या संपामध्ये सहभागी होते. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पांगळी झाली होती. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारे आंदोलन करून शासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यंदाची दिवाळीदेखील कर्मचाऱ्यांनी संप मंडपातच साजरी केली. तसेच ३१ ऑक्टोबरला मुंबई आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दहा वर्षे सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना ३० टक्के थेट सेवा समावेशन व ७० टक्के सरळसेवा भरती प्रक्रिया राबवून धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भातील आश्वासन दिले होते.
तसेच २९ नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चेनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद संपाला काही दिवसांची स्थगिती दिली आहे. परंतु जर आरोग्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र १४ डिसेंबरला अधिवेशनावर तीव्र जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहणार असल्याचा इशारादेखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.