दीड महिन्यानंतर शाळेत शिजली पोषण आहाराची खिचडी
By जितेंद्र दखने | Published: March 25, 2023 12:52 PM2023-03-25T12:52:58+5:302023-03-25T12:55:05+5:30
तांदळाचा पुरवठा : २,३८८ शाळांत पोहोचला आहार
अमरावती : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहाराचा पुरवठा करार संपल्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहारात दिली जाणारी खिचडी शिजणे बंद झाले होते. अखेर दीड महिन्यानंतर जिल्ह्यातील २ हजार ३८८ शाळांमध्ये पोषण आहाराचा शिधा पोहोचल्याने पोषण आहारातील खिचडी शिजू लागली आहे.
जिल्ह्यातील २ हजार ३८८ शाळांना गत १ फेब्रुवारीपासून तर १५ मार्चपर्यत आहाराकरिता तांदळाचा पुरवठाच झाला नव्हता. त्यामुळे याबाबतचा शाळांनी जिल्हा परिषदेला पाठविला होता. याकरिता शिक्षण विभागाचाही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर आता पुरवठादारासोबत करार झाल्यामुळे १६ मार्चपासून जिल्हाभरातील शाळांमध्ये पोषण आहाराकरिता तांदळाचा पुरवठा झाला आहे.
त्यामुळे २३८८ शाळांमध्ये पुन्हा दीड महिन्याच्या अवकाशानंतर पोषण आहाराची खिचडी शिजू लागली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १,५७३, नगरपरिषद, मनपाच्या १६१ आणि खासगी अनुदानित ६४९ अशा २,३८८ शाळांचा समावेश आहे. या शाळांतील सुमारे दोन लाख ४६ हजार ४५६ विद्यार्थ्यांच्या खिचडीचा आस्वाद आता बहुप्रतीक्षेनंतर मिळू लागला आहे.
या विद्यार्थ्यांना मिळतो पोषण आहार
राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगपालिका आणि खासगी अनुदानित शाळांना पोषण आहार वाटप केला जातो. या शाळांमध्ये जिल्ह्यात पहिली ते पाचवीची पटसंख्या एक लाख ४३ हजार २२३, तर सहावी ते आठवीचा पटसंख्या एक लाख तीन हजार २३३ अशा एकूण दोन लाख ४६ हजार ४५६ विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून दर महिन्यात केले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांना आहार दिला जातो.
दृष्टिक्षेपात संख्या
एकूण शाळा- २,३८८
जिल्हा परिषद शाळा- १,५७३
न.प., मनपा- १६१
शासकीय शाळा- ०५
खासगी अनुदानित- ६४९
पहिली ते पाचवी विद्यार्थी- १,४३,२२३
सहावी ते आठवी विद्यार्थी- १०३२३३
शालेय पोषण आहारासाठी जिल्ह्यातील २३८८ शाळांना तांदळाचा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे शाळांमध्ये पोषण आहार पोहोचता केलेला आहे. परिणामी पोषण आहाराचेही वितरण सुरळीत झालेले आहे.
- स्वप्नील सुपासे, लेखा अधिकारी, शालेय पोषण आहार