अखेर गुडेवार परतले
By admin | Published: June 4, 2016 11:59 PM2016-06-04T23:59:27+5:302016-06-04T23:59:27+5:30
अवघ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळानंतर राजकीय बळी ठरलेले तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार अमरावतीत परतले आहेत.
सुखद धक्का : ‘डीआरडीए’त प्रकल्प संचालक
अमरावती : अवघ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळानंतर राजकीय बळी ठरलेले तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार अमरावतीत परतले आहेत. राज्य शासनाने त्यांची अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून पदस्थापना केली आहे. ‘डीआरडीए’चे प्रकल्प संचालक म्हणून गुडेवार सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे संकेत आहेत.
गत १६ मे रोजी गुडेवार यांची अमरावती महानगरपालिका आुयक्तपदावरून बदली झाली होती. त्यांना ग्रामविकास व जलसंधारण विभाग या मूळ विभागात मंत्रालयात पाठविण्यात आले होते. १५ दिवस त्यांची कुठल्याही पदावर नियुक्ती झालेली नव्हती. दरम्यान शनिवार ४ जून रोजी ग्रामविकास विभागाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील चंद्रकांत गुडेवार यांची प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा अमरावती या रिक्त पदावर पदस्थापना केली. सदर पदाचा पदभार त्वरित स्वीकारावा, अशा सूचनाही शासन निर्देशातून देण्यात आल्या आहेत.
के. एम. अहमद यांची वाशिमला बदली झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ‘डीआरडीए’च्या प्रकल्प संचालकाचा तात्पुरता प्रभार दिलीप मानकर यांच्याकडे देण्यात आला होता. सोमवारी मानकर यांच्याकडून गुडेवार नियमित प्रकल्प संचालक म्हणून कार्यकार स्वीकारतील, अशी माहिती आहे.
‘तो’ काळ गाजवला
२ जून २००६ ते २ आॅगस्ट २००८ या सव्वा दोनवर्षाच्या कालावधीत चंद्रकांत गुडेवार अमरावतीच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या संस्थेतील आर्थिक अनियमितता उघड केली होती. ‘डिआरडीए’ त्यावेळी गुडेवारांच्या कर्तव्यशुचितेने गाजले. ८ वर्षाचा प्रदीर्घ कालावधीनंतर गुुडेवार पुन्हा ‘डीआरडीए’ परतले आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांचा अल्पसा कार्यकाळ ‘डेयरडॅशिंग’ असाच राहिला.