अखेर महिला शेतकऱ्यासमोर झुकले प्रशासन
By Admin | Published: June 16, 2017 12:07 AM2017-06-16T00:07:25+5:302017-06-16T00:07:25+5:30
शेती वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात प्रशासनाने चुकीचा निर्णय दिल्याने आधीच हृदयविकाराने त्रस्त शेतकऱ्यासमोर
न्यायाचा लढा : वहिवाटीच्या रस्त्याचा होता वाद
मनोज मानतकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : शेती वहिवाटीच्या रस्त्यासंदर्भात प्रशासनाने चुकीचा निर्णय दिल्याने आधीच हृदयविकाराने त्रस्त शेतकऱ्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला. मात्र, त्यांच्या सहचारीणीने त्यांची साथ सोडली नाही. ती पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यासाठी तिने वर्षभर शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून ही लढाई त्या जिंकल्या. अखेर महिला शेतकऱ्याच्या चिकाटीपुढे प्रशासनाला झुकावेच लागले.
या लढ्यात सदर महिला शेतकऱ्याला स्थानिक नगरसेविका कल्पना मारोटकर यांनीदेखील सहकार्य केले. अखेर वहिवाटीच्या रस्त्याबाबत प्रशासनाने दिलेला चुकीचा आदेश रद्द केला. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. विस्तृत माहितीनुसार, नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी दिलीप व कुसूम काकडे या दाम्पत्याची मौजा धारवाडी शेत सर्वे नं. १२/१ क मध्ये १ हेक्टर ६२ आर. शेतजमीन आहे. काही अंतरावर एका व्यावसायिकाची जमीन आहे. या व्यावसायिकाने या जमिनीवर पेरणी करताना काकडे दाम्पत्याची कोणतीच परवानगी न घेता त्यांच्या शेतातून ट्रॅक्टरची वाहतूक केली. याबाबत काकडे यांनी त्यांना विचारणा केली असता प्रशासनानेच तशी परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे काकडे दाम्पत्याच्या शेतीची बरीच हानी झाली. त्यांच्या शेतातील पीक नष्ट झाले. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबाने तहसील प्रशासनाकडे धाव घेतली. परंतु निगरगट्ट प्रशासनाने या कुटुंबाला टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वारंवार बोळवण केली. प्रशासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे आधीच हृदयविकाराने आजारी असलेल्या दिलीप काकडे यांची प्रकृती खालावली असताना मात्र, त्यांच्या पत्नी कुसूम काकडे यांनी पतीचा हा लढा पुढे सुरूच ठेवला. महिला मैदानात उतरल्याने हा लढा चिघळणार हे लक्षात येताच प्रशासनाने वहिवाटीच्या रस्त्याबाबत दिलेला निर्णय रद्द करीत जोडधुऱ्यावरून फक्त बैलगाडीने रस्ता वाहिती करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
धनदांडग्यांच्या दबावात येऊन प्रशासन चुकीचा निर्णय देत असेल व गरीब कुटुंबावर अन्याय करीत असेल तर अन्यायाविरोधात लढणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते. मीदेखील तेच केले.
- कल्पना मारोटकर,
नगरसेविका, वॉर्ड क्र.१