अखेर "तो" रस्ता होणार दुरुस्त
By admin | Published: April 28, 2017 12:09 AM2017-04-28T00:09:35+5:302017-04-28T00:09:35+5:30
तालुक्यातील ममदापूर, इसापूर, काटसूर, सुलतानपूरच्या १३ ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती व शेतकरी हिताच्या
आंदोलनाची फलश्रुती : जि.प.सभापती, सदस्यांची मध्यस्थी
तिवसा : तालुक्यातील ममदापूर, इसापूर, काटसूर, सुलतानपूरच्या १३ ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती व शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांसाठी ग्रा.पं. सदस्य मुुकुंद पुनसे यांच्या नेतृत्वात सोमवारी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर मंगळवारी सुटले. संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
ममदापूर, इसापूर, सुल्तानपूर, काटसूर, फत्तेपूर या गावांशी संबंधित विविध समस्यांसाठी मुकुंद पुनसे, त्रिशूल वानखडे, सुरेंद्र इंगळे, शरद देशमुख, श्रीधर इंगळे, शकील शहा, अंकुश बोके, सतीश शिंदे, पवन इंगळे, गौरव इंगळे, अजय बोके, हैबतराव गाडगे, नितीन मसलदी या नागरिकांनी २४ एप्रिल रोजी इसापूर मार्गावर बेमुदत उपोषण सुरू केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता खराब झाल्याने गावकऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत. आंदोलनकर्त्यांनी २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ममदापूर-इसापूर मार्गावर खड्ड्यात बेशरमचे झाड लावून प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर गावकऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेत जि.प.बांधकाम सभापती जयंत देशमुख व या भागातील नवनियुक्त जि.प.सदस्य अभिजित बोके यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. चर्चा करीत अधिकाऱ्यांनी मार्ग काढला व सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार राम लंके, पं.स.सदस्य लुकेश केने, संबधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)