दहा दुकाने फोडून बिनधास्त पाहत होते थिएटरात पिक्चर! एक विधीसंघर्षित बालकही ताब्यात

By प्रदीप भाकरे | Published: January 15, 2024 05:30 PM2024-01-15T17:30:42+5:302024-01-15T17:31:15+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

After breaking into ten shops, they were watching the movie in the theater | दहा दुकाने फोडून बिनधास्त पाहत होते थिएटरात पिक्चर! एक विधीसंघर्षित बालकही ताब्यात

दहा दुकाने फोडून बिनधास्त पाहत होते थिएटरात पिक्चर! एक विधीसंघर्षित बालकही ताब्यात

अमरावती : नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिझिलॅंड या व्यापारी संकुलातील दहा दुकाने फोडून ६३ हजार ५०० रुपये लांबविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने १४ जानेवारी रोजी रात्री अटक केली. या प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले. मयूर किशोर सोळंके (१८) व रोहित चंदूलाल विश्वकर्मा (२१, दोघेही रा. जुना कॉटन मार्केट परिसर, अमरावती) अशी अटक चोरांची नावे आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी त्यांना येथील एका चित्रपटगृहातून ताब्यात घेतले.

बिझिलॅंड व्यापारी संकुलातील दहा दुकाने फोडून त्यातील आठ दुकानातून ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आली होती. १४ जानेवारी रोजी सकाळी ही घटना उजेडात आल्यावर रवी खेमचंदानी (४२, रा. सिंधी कॅम्प) यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट एकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान तो गुन्हा हा मयूर सोळंके व त्याच्या साथीदारांनी केला असून ते सध्या एका चित्रपटगृहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. या माहितीच्या आधारावर मयूर सोळंके व रोहित विश्वकर्मा या दोघांना चित्रपटगृह परिसरातून अटक करण्यात आली. सोबतच विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले.

कुख्यात मयुरजवळ आढळला चायना चाकू

चौकशीदरम्यान त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. अंगझडतीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या मयूर सोळंके याच्याजवळ एक चायना चाकूसुद्धा आढळून आला. त्यांच्याकडून चायना चाकू, रोख ९ हजार ६० रुपये व दोन मोबाइल असा एकूण २९ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, भूषण पद्मणे, किशोर खेंगरे यांनी केली.

Web Title: After breaking into ten shops, they were watching the movie in the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.