बृहन्मुंबई महापालिकेनंतर आता अमरावतीला निवडणुकीचे वेध?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 05:00 AM2022-01-30T05:00:00+5:302022-01-30T05:01:03+5:30
नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपिल (सी) क्र. १९७५६/२०२१ मध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबतची आकडेवारी संबंधित मागासवर्ग आयोगास द्यावी, मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्याला तसेच राज्य निवडणूक आयोगास कराव्यात, असे आदेशित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे आदी कार्यक्रम जाहीर केला आहे. १ फेब्रुवारी ते २ मार्च अशी ‘डेडलाईन‘ निश्चित केली आहे. त्यामुळे आता अमरावती महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत हरकती, सूचना घेण्यासंदर्भात वेध लागले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीबाबत कार्यक्रम जाहीर हाेण्याचे संकेत आहेत.
अमरावती महापालिकेत निवडणुकीत २०२२ च्या निवडणुकीत ९८ सदस्य निवडीसाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे. सन २०११ च्या आकडेवारीनुसार अमरावती शहराची लोकसंख्या ६ लाख ४७ हजार ७५ गृहीत धरली जाणार आहे. सध्या महापालिकेत ८७ सदस्यसंख्या आहे.
दरम्यान, सहा लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंतच्या लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व कमाल संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल, असे नवे निकष लावण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ९८ सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांसह स्वतंत्रपणे उभे राहू इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवार प्रशासनाच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत.
प्रभागाच्या सीमा प्रसिद्ध हरकतींना प्राधान्य
ओबीसींच्या शिफारशी प्राप्त होण्यास अथवा योग्य तो निर्णय घेण्यास कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करणे, निवडणूक प्रहरी निश्चित करण्यापूर्वी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रथम निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करून त्यावरील हरकती व सूचना प्राप्त करून सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने २७ जानेवारी रोजी सुधारित आदेश जारी केला.
ओबीसी आरक्षणाचा मार्ग झाला सुकर
नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपिल (सी) क्र. १९७५६/२०२१ मध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबतची आकडेवारी संबंधित मागासवर्ग आयोगास द्यावी, मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्याला तसेच राज्य निवडणूक आयोगास कराव्यात, असे आदेशित केले आहे.
एक प्रभागात १७ ते २१ हजार लोकसंख्या
अमरावती महापालिकेची निवडणूक ९८ सदस्यांसाठी होणार आहे. तीन सदस्यीय प्रभाग प्रणालीनुसार एकूण ३३ प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. यात ३२ प्रभागांमध्ये तीन सदस्य, तर एका प्रभागात दोन सदस्य निवडून महापालिकेत जातील. ३३ प्रभागात ९८ नगरसेवक अशी नवीन रचना असणार आहे.
एप्रिल अथवा मे महिन्यात निवडणूक
बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुका २०२२ प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता व निवडणूक प्रभागांच्या सीमा जाहीर करून हरकती व सूचना मागविणे आणि सुनावणी देण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या शेवटी अथवा १५ मे दरम्यान होईल, असे संकेत आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेसाठी स्वंतत्र कायदा आहे. हीच नियमावली अमरावती महापालिकेला लागू होईल, असे नाही. मात्र, फेब्रुवारीत प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे आदी कार्यक्रम जाहीर होईल, असे संकेत आहेत.
- प्रवीण आष्टीकर,
आयुक्त, महापालिका