शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मरण यातनाढोक कुटुंबाची व्यथा : तीन मुलींच्या संगोपनाचा पत्नीसमोर प्रश्न

By admin | Published: April 26, 2015 12:20 AM2015-04-26T00:20:14+5:302015-04-26T00:20:14+5:30

रात्रीचा दिवस करून श्रम केले, कर्ज घेतले. पीक उगवेल आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल, ...

After the death of the family, the family will die | शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मरण यातनाढोक कुटुंबाची व्यथा : तीन मुलींच्या संगोपनाचा पत्नीसमोर प्रश्न

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मरण यातनाढोक कुटुंबाची व्यथा : तीन मुलींच्या संगोपनाचा पत्नीसमोर प्रश्न

Next

संजय खासबागे वरुड
रात्रीचा दिवस करून श्रम केले, कर्ज घेतले. पीक उगवेल आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा होती. परंतु निसर्ग रूष्ट झाला आणि सारी स्वप्ने मातीमोल झाली. ऋणदात्यांचा तगादा सुरू झाला. शेवटी हतबल झालेल्या ‘त्या’ बळीराजाने आत्महत्येचा मार्ग पत्करला. संसाराच्या रहाटगाडग्यातून त्याची मुक्तता झाली. पण, मागे राहिलेल्या तीन मुली आणि पत्नीच्या दुर्देवाचे दशावतार आता सुरू झाले आहेत.
वरूड तालुक्यातील खानापूर येथील शिवहरी वामनराव ढोक या े(४५) वर्षीय शेतकऱ्याने हातचे पीक गेल्याने ५ एप्रिल रोजी आपली जीवनयात्रा संपविली. शिवहरीच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर कुठाराघात झाला. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या असलेल्या तीन मुली आणि पत्नीची मात्र वाताहत सुरू आहे. घरातील कर्त्या पुरूषाच्या मृत्यूनंतर हे अख्खे कुटुंब वाऱ्यावर आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या चौघी मायलेकींजवळ हक्काचा निवारादेखील नाही. ज्या घरात सध्या त्यांचे वास्तव्य आहे ते घर रिकामे करण्याचा तगादा घरमालकाने लावला आहे.
या कुटुंबातील अन्नधान्याला केव्हाचे बूड लागले आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबाला भेटी देऊन केवळ तांदूळ आणि गहू देऊन त्यांची बोळवण केली. घरधनी गेला, आता तीन मुलींचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न शिवहरींच्या विधवा पत्नी रमाबाई यांच्यापुढे उभा ठाकला आहे. शिवहरींच्या मृत्यूला महिना लोटत आला तरी मदत मिळण्याचे संकेत नाहीत.
शिवहरी ढोक यांची मोठी मुलगी डिंपल बीएला तर श्वेता इयत्ता १० वीत आणि संपदा ६ वीत शिकत आहे. नापिकीमुळे घरात अठराविश्वे दारिद्र्य आहे. याच काळजीपोटी आणि खासगी फायनान्स संस्थांचे कर्ज कसे फेडावे? या विचारातून आलेल्या नैराश्यातून शिवहरींनी मृत्यूला कवटाळले. त्यांचे स्वत:चे राहते घर पावसाळयात जमीनदोस्त झाले. दुसऱ्याच्या घरात संसार थाटला, त्यांच्याकडे केवळ अडीच एकर कोरडवाहू शेती. यामध्ये कपाशी आणि तूर पेरली. मात्र, निसर्गाने साथ दिली नाही. कपाशी बुडाली. कुटुंबाच्या डोक्यावर छप्पर असावे, म्हणून घरबांधणीसाठी त्यांनी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले. नापिकीमुळे हे कर्ज त्यांना फेडता आले नाही. शासनाकडून नापिकीची रक्कम मिळाली तीदेखील अवघी दोन हजार ४०० रुपये. यामुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.
शिवहरी गेले. पण, त्यांच्या अंत्यसंस्काराची सोयदेखील त्यांच्या कुटुंबीयांजवळ नव्हती. शेजाऱ्यांच्या आणि नातलगांच्या मदतीतून अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर शासनाच्या बड्या अधिकाऱ्यांनी ढोक कुटुंबाचे सांत्वन करुन ५० किलो गहू आणि तांदूळ दिले. त्यानंतर आतापर्यंत या कुुटुंबाला कोणतीच मदत मिळालेली नाही. मृत शिवहरी ढोक यांच्याकडे कर्ज वसुलीकरिता रात्री-बेरात्री चकरा मारणाऱ्या फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीने नाकी नऊ आणले होते. त्या फायनान्स कंपनीविरुध्द अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, याची माहिती नाही.

खासदारांनी दिली अवघ्या पाच हजारांची मदत
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी ढोक कुटुंबाला अवघ्या पाच हजारांची मदत देऊन सांत्वन केले. या कुटुंबातील मृताची पत्नी आणि तीन मुलींची विदारक अवस्था पाहून पाच हजारांची मदत केली.
जायन्टस ग्रुपने घेतली
मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी
वरूडच्या जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष मनोहर आंडे यांनी ढोक कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था पाहून रोख दहा हजार रुपयांची मदत केली. एका मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. यामुळे तूर्तास या कुटुंबाला दिलासा मिळाला असला तरी शासनाची मदत अद्यापही प्राप्त झालेली नाही, ही शोकांतिका आहे.

शासनाकडून शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाठविण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री निधीतूनही मदतीकरिता अहवाल सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात हे प्रकरण प्रविष्ठ आहे. समितीची बैठक झाल्यानंतर ढोक कुटुंबाला मदत प्राप्त होईल.
- ललितकुमार वऱ्हाडे,
उपविभागीय अधिकारी.

Web Title: After the death of the family, the family will die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.