दफनविधीनंतरही मृतदेहासाठी पत्नीची धडपड
By admin | Published: February 12, 2017 12:01 AM2017-02-12T00:01:20+5:302017-02-12T00:01:20+5:30
हिंदू स्मशानभूमी परिसरात पुरण्यात आलेला मृतदेह परत मिळविण्यासाठी पारधी समाजाच्या महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव : पारधी समाजाच्या महिलेची आर्त हाक
अमरावती : हिंदू स्मशानभूमी परिसरात पुरण्यात आलेला मृतदेह परत मिळविण्यासाठी पारधी समाजाच्या महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. मात्र, तिच्या आर्त हाकेला जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद दिला नसल्याने त्या महिलेची फरफट होत आहे.
५ जानेवारीला लोणी परिसरात पारधी समाजाचे वकिदा टिल्या पवार (२५,रा.) यांचे अपघाती निधन झाले. याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली नसल्याचे मृताची पत्नी जुल्लु गंगाराम भोसले (रा. मूर्तिजापूर गायरान, अकोला) यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी वकिदा टिल्या पवार यांचा हिन्दू स्मशानभूमि संस्थान परिसरात दफनविधी केला गेला. मात्र, हा दफनविधी पारधी समाजाच्या विधीनुसार करायचा असल्यामुळे जमिनीत पुरलेला पतीचा मृतदेह बाहेर काढून माझ्या ताब्यात द्यावा, अशी मागणी महिलेची आहे. या मागणीचे निवेदन जुल्लू भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले, मात्र व्यर्थ!
ती महिला अनवाणी, उपाशीतापाशी जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिझवीत असून न्यायाची अपेक्षा करीत आहे. (प्रतिनिधी)
दफनविधी करण्यापूर्वी मृताच्या सासऱ्याची सहमती घेतली होती. मृतदेह बाहेर काढण्यास सबळ कारण नाही.
- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती