जामीन मिळताच एम. श्रीनिवास रेड्डींना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:54+5:302021-05-14T04:13:54+5:30
आरटीपीसीआर चाचणी अहवाल, महापालिका प्रशासनाने कारागृहाला कळविले अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित ...
आरटीपीसीआर चाचणी अहवाल, महापालिका प्रशासनाने कारागृहाला कळविले
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यासंदर्भात अमरावती महापालिका प्रशासनाने कारागृहाला कळविले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ११ मे रोजी रेड्ङींना सशर्त अंतरिम जामीन मंजूर करताच त्यांना कोरोनाने ग्रासले आहे. रेड्डींना नेमके कुठे लागण झाली, याबाबत कारागृह प्रशासन शोध घेत आहे. ११ मे रोजी रेड्डी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. या चाचणी अहवालाबाबतची माहिती गुरूवारी महापालिकेने कळविली आहे. अंध विद्यालयात साकारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात १ मे पासून रेड्डी यांचा मुक्काम होता. तात्पुरत्या कारागृहात रेड्डींना आणले तेव्हा त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह होता. मात्र, येथेच अन्य कैद्यांच्या संपर्कात ते आले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ज्या कक्षात रेड्डींना ठेवण्यात आले होते, तेथील अन्य कैद्यांची आरटीपीआर चाचणी केली जाणार आहे. हल्ली अमरावती मध्यवर्ती कारागृहात केवळ एकच कैदी पॉझिटिव्ह असून, येथील विभागीय हाेमगार्ड कार्यालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र, १२ मे रोजी रेड्डी जामिनावर सुटताच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
-------------
११ मे रोजी एम. श्रीनिवास रेड्डी यांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. १३ मे रोजी त्यांना लागण झाल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. शुक्रवारी चाचणी अहवाल मिळविण्यात येणार आहे. तसे रेड्डींना कळविण्यात येईल.
- एस. आय. थोरात, वैद्यकीय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह, अमरावती