जलयुक्त शिवार योजनेनंतर वृक्ष लागवडीची झाडाझडती, वनसंरक्षकांमार्फत होणार ‘क्राॅस चेकिंग’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:11 AM2020-12-08T06:11:35+5:302020-12-08T07:49:05+5:30
युती शासनाच्या काळात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे.
- गणेश वासनिक
अमरावती : महाविकास आघाडी सरकारने ‘जलयुक्त शिवार’नंतर ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेची झाडाझडती सुरू केली आहे.
युती शासनाच्या काळात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अमरावती प्रादेशिक वनवृत्तात कार्यवाही सुरू असून सहायक वनसंरक्षकांमार्फत ‘क्रॉस चेकींग’ करून अहवाल मागविण्यात आला आहे.
तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ३३ कोटी वृक्ष लागवड ही योजना राबविण्यात आली. या मोहिमेवर ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्रॉफी आदींद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र, नेमके किती वृक्ष जिवंत आहेत, याचे वनविभागाने अंतर्गत मूल्यांकन चालविले आहे.
वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर ४६ यंत्रणाच्या सहकार्याने ही मोहीम राबविली. मात्र, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग
वगळता अन्य यंत्रणांनी केलेली वृक्षलागवड केवळ ‘फोटो सेशन’ पुरती मर्यादित होती, असे मूल्यांकनावरून दिसून येते.
राज्यात अशी झाली होती ३३ कोटी वृक्षलागवड
अमरावती - ४२,३६,९००, अकोला - २८,९६.५००, वाशिम - २२,८३,५००, यवतमाळ - ५८,६४,८५०, बुलडाणा - ३९, ९८,१५०, नाशिक - ६४,९६,०५०, अहमदनगर - ५५,६३,८५०, धुळे - २४,७६.१००, जळगाव - ५४,४३, ९००, नंदुरबार - २४,४४.७००, रत्नागिरी - ३७,६२,९००, सिंधुदुर्ग -२३,५८,९००, रायगड - ४१,४३,३००, पालघर - २८,२०,९५०, मुंबई सिटी - १,३६,२००, पुणे - ७६.०२,८००, सोलापूर - ५४,३२.३५०, सातारा - ६३,७६,७५०, सांगली - ४५,०१,३५०, कोल्हापूर - ५१,४०,४००, औरंगाबाद - ५७,९५,४५०, जालना - ६४.८४,४५०, बीड - ५७,६०,३५०, परभणी - ६४,८५,७५०, हिंगोली - ३१.०८,७००, लातूर- ६,२२,८५०, नांदेड - ५८,६२,२००, गोंदिया - ३१,८१,२५०, चंद्रपूर - ५७,०२,३५० गडचिरोली -२१.८५,९०० भंडारा - २४,४३,८०० अशी जिल्हानिहाय नोंद आहे.
३३ कोटी वृक्ष लागवडीची
पाच निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करावी, असे पत्र मी स्वतः हे ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर दिले होते. त्यांनी आता जरूर चौकशी करावी. लावण्यात आलेली झाडे सरकारच्या सर्व विभागांनी मिळून लावलेली
आहेत, एकट्या वनविभागाने नाही. त्यामुळे सर्वच विभागांची चौकशी करावी लागेल. वन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विकास खारगे, हे आता मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव आहेत. चौकशी सुरू असताना त्यांनादेखील दूर ठेवावे लागेल. निष्पक्षपणे ही चौकशी करावी. त्यासाठी जे सहकार्य लागेल ते मी द्यायला तयार आहे. आम्ही हे ईश्वरीय कार्य म्हणून केले आहे. त्यामुळे चौकशीतून सत्य बाहेर येईल.
- सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशानुसार ३३ कोटी वृक्षलागवडीतील जिवंत रोपांचे मूल्यांकन, उंची तपासली जात आहे. सहायक वनसंरक्षकाना ही जबाबदारी सोपविली असून, ‘क्रॉस चेकिंग’ होत आहे. मूल्यांकन अहवाल प्राप्त होताच वरिष्ठांकडे तो पाठविला जाईल.
- प्रवीण चव्हाण, मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती