नोटाबंदीनंतर तूरबंदी हे मोठे संकट
By admin | Published: April 26, 2017 12:14 AM2017-04-26T00:14:12+5:302017-04-26T00:14:12+5:30
शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.
तत्काळ तूर खरेदीची मागणी : विभागीय आयुक्तांच्या दालनात बच्चू कडूंचा ठिय्या
अमरावती : शेतकऱ्यांजवळील शेवटचा तुरीचा दानाही शासन खरेदी करेल, अशी ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. जेवढी तूर खरेदी केली त्यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. तूर खरेदी बंद, हे नोटाबंदीनंतरचे सर्वात मोठे संकट आहे, असा आरोप करीत आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांच्या दालनात ठिय्या दिला.
केंद्रावर अद्याप अडीच लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतिक्षेत आहे व यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. मुलांचे शिक्षण, घरातील लग्नकार्य कसे करावे या विवंचनेत शेतकरी आहे. अश्या परिस्थितीत शासनाने तूर खरेदी बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झालं, हे सरकारच्या डोळ्यात खुपते काय? असा सवाल आ. कडू यांनी केला.
दोन महिने तुरीचे पेमेंट मिळत नाही, कधी बारदाना नाही तर कधी गोदामांची कमी, अशी किती कारणे सरकार सांगणार आहेत.
‘त्या’ शेतकऱ्यावर होणार गुन्हा दाखल
अमरावती : जिल्ह्यात जितके तुरीचे उत्पादन झाले त्यापैकी ५० टक्के तूर व्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारात खरेदी केली. साडेतीन लाख क्विंटल शासकीय तूर केंद्राद्वारे खरेदी केली व साधारणपणे तेवढीच तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्रावर महिना-महिना शेतकऱ्यांची तूर मोजणी होत नाही. मात्र व्यापाऱ्यांची या अवधीत कित्येक वेळा तूर खरेदी केल्या जाते असा आरोप आ. कडू यांनी केला.
जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावरील तुरीची खरेदी केली जाईल, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगताच आ. कडू यांनी ठिय्या आंदोलनाची सांगता केली.
चांदूरबाजार येथील तूर खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याने एकाच सात-बारावर चार वेळा तूर विक्री केली. शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी तूर विक्री करतात. आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता अन् व्यापाऱ्यांना मोकळं सोडता असे बोल आ. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांना सुनावले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांवर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)
- तर मंत्र्याच्या घरी तुरीचे कुटार नेऊ
शासकीय तूर खरेदी केंद्रावरील तुरीची तत्काळ खरेदी करा या मागणीसाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले व नंतर शासनाने शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नाही, तर तुरीचे कुटार मंत्र्याच्या घरात नेऊन टाकू, हा आंदोलनाचा दुसरा टप्पा राहील, अशी माहिती आ. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
व्यापाऱ्यांची गोदामे तपासण्याच्या सूचना
व्यापाऱ्यांनी कमी भावाने खुल्या बाजारातून तुरीची खरेदी केली व हीच तूर हमी भावाने शासनाला विकत आहे. यासाठी व्यापाऱ्यांच्या गोदामातील तुरीची पडताळणी करावी. तसेच शेतकऱ्यांच्या घरी किती तूर पडून आहे याची माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांकडील तुरीचा अंदाज येईल, अशी सूचना आ. कडू यांनी विभागीय आयुक्तांना केली.